Site icon

Nashik : ‘डॅमेज कंट्रोल’साठी उद्धव ठाकरे उतरणार नाशिकच्या मैदानात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिकमध्ये ठाकरे गटातून माजी नगरसेवकांचा मोठा गट फुटून शिंदे गटात सामील झाल्याने ठाकरे गटाला मोठा हादरा बसला आहे. यानंतरही आणखी काही माजी नगरसेवक बाहेर पडणार असल्याने नाशिकमधील हे डॅमेज कंट्रोल राेखण्यासाठी आता स्वत: पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच नाशिकच्या मैदानात उतरणार आहे. जानेवारीअखेर ठाकरे नाशिकच्या दौऱ्यावर येणार असून, त्यापूर्वी शनिवारी, रविवारी खासदार संजय राऊत नाशिकमध्ये येऊन चाचपणी करणार आहेत.

कारागृहातून सुटका झाल्यानंतर खासदार संजय राऊत काही दिवसांनी नाशिकला आले. आणि नाशिकमधून एकही शिवसैनिक बाहेर पडणार नाही, असे सांगत नाशिक अभेद्य असण्याचा दावा केला होता. मात्र, मागील महिन्यात राऊतांची पाठ फिरताच ठाकरे गटातील ११ माजी नगरसेवकांनी शिंदे गट गाठत ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला. त्यानंतर काहीच दिवसांनी नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख असलेले भाऊसाहेब चौधरी यांनीही ठाकरे गटाला हादरा देत शिंदे गटात प्रवेश केल्याने नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठे भगदाड पडले. यामुळे ठाकरे गट हादरून गेला असून, सुरू असलेले हे डॅमेज थांबविण्यासाठी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात गेलेल्यांच्या प्रभागांमध्ये मेळावे आयोजित केले आहेत. नाशिकमध्ये सुरू असलेल्या घडामोडींची माहिती देण्यासाठी बुधवारी (दि. ४) नाशिकचे पदाधिकारी मुंबईत गेले होते. माताेश्रीवर ठाकरे यांची भेट घेत माहिती सादर केली. या भेटीत पक्ष सोडून गेलेल्यांच्या प्रत्येक प्रभागात सक्षम पर्याय देण्याचे निर्देश ठाकरेंनी दिले.

येत्या शनिवारी आणि रविवारी खासदार संजय राऊत नाशिक दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते संघटनात्मक स्थितीचा आढावा घेतील. चौधरी यांच्या रिक्त जागी जिल्हा संपर्कप्रमुखपदी स्थानिक शिवसैनिकाला संधी द्यायची की मुंबईतून याबाबत चाचपणी केली जात आहे. दिंडाेरीचे जिल्हाप्रमुख सुनील पाटील यांच्या जागीदेखील अन्य पदाधिकाऱ्याची नेमणूक केली जाणार आहे.

नाशिककडे राजकीय वर्तुळाचे लक्ष

मुंबई, ठाणेपाठोपाठ सर्वाधिक मोठ्या प्रमाणावर नाशिकमधून फाटाफूट झाल्याने राजकीय वर्तुळाचे आगामी राजकीय घडामोडींबाबत सर्वांचेच नाशिककडे लक्ष लागून आहे. ठाकरे गटातील ११ माजी नगरसेवकांनंतर आणखी १० ते १२ माजी नगरसेवक व पदाधिकारी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देणार असल्याचे वृत्त असल्याने आगामी निवडणुकीच्या दृष्टीने हे डॅमेज ठाकरे गटाला न परवडणारे आहे. त्यामुळेच खुद्द उद्धव ठाकरेंनाच नाशिकला यावे लागत आहे.

हेही वाचा :

The post Nashik : 'डॅमेज कंट्रोल'साठी उद्धव ठाकरे उतरणार नाशिकच्या मैदानात appeared first on पुढारी.

Exit mobile version