Nashik : डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी अमित ठाकरे सरसावले

अमित ठाकरे नाशिक,www.pudhari

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मनसेतून शहर समन्वयक सचिन भोसले आणि त्यानंतर विभाग अध्यक्षांसह माजी नगरसेविकेने शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी नाशिकमधील पक्षाचे डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी मंगळवारी (दि. २७) नाशिकमध्ये पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिल्या दिवशी ५६ शाखाध्यक्षांशी वन टू वन संवाद साधला. दरम्यान, काही मनसैनिकांवर नव्याने जबाबदारी सोपविली जाणार असल्याने त्यांच्याशी ठाकरे बुधवारी (दि.२८) संवाद साधणार आहेत.

राज ठाकरे यांनी नाशिकची जबाबदारी युवा नेते अमित ठाकरे यांच्यावर सोपवली आहे. अमित ठाकरे यांनी आतापर्यंत नाशिकचा तीन वेळा दौरा केला आहे. त्यांच्याकडे मनसेच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्षपद आहे. मध्यंतरी त्यांनी नाशिक शहर व जिल्ह्यातील काही नावाजलेल्या महाविद्यालयांना भेटी देत तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता. त्यांनी मनविसेच्या पुनर्बांधणीसाठी सहा महिन्यांपासून महासंपर्क अभियान सुरू केले आहे. अमित ठाकरे यांनी ऑगस्टमध्ये नाशिकचा दौरा करून शहरातील संघटनात्मक स्थितीचा आढावा घेतला होता. तसेच शाखाध्यक्षांची नियुक्ती करत खांदेपालट केले होते. पक्षातील वाद आणि अंतर्गत कलह यामुळे राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मुंबईला बोलावून झाडाझडतीदेखील घेतली होती. त्यानंतर शहर समन्वयक सचिन भोसले यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश केला. पाठोपाठ नाशिकरोड विभाग अध्यक्ष विक्रम कदम यांनीदेखील राजीनामा दिला आहे. नाशिक पूर्वमधील एक माजी नगरसेविका शिंदे गटात प्रवेश करणार असून, अमित ठाकरे नाशिक दौऱ्यावर असतानाच एका विभाग अध्यक्षाने मनसेला जय महाराष्ट्र करत शिंदे सेनेची वाट धरली आहे. मंगळवारी (दि.२७) ठाकरे यांनी आठ प्रभाग आणि पंचवटीचे सहा प्रभाग अशा १४ प्रभागांतील ५६ शाखाध्यक्षांशी चर्चा केली. सिडको, सातपूर आणि नाशिकरोड विभागातील पदाधिकाऱ्यांशी बुधवारी (दि.२८) संवाद साधणार आहेत.

ठक्कर बाजार येथील राजगड कार्यालयात बंद दाराआड शाखाध्यक्षांशी झालेल्या चर्चेत अमित ठाकरे यांनी पक्ष पुनर्बांधणी तसेच आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाची काय भूमिका असावी, याबाबत पदाधिकाऱ्यांना विचारणा केली. त्यावर बहुतांश शाखाध्यक्षांनी शिंदे गट किंवा भाजपसोबत युती करण्याविषयी मतप्रदर्शन केले.

हेही वाचा :

The post Nashik : डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी अमित ठाकरे सरसावले appeared first on पुढारी.