Nashik : त्र्यंबकरोडवर वाहनांच्या काचा फोडून किमती ऐवज केला लंपास

कारच्या काचा फोडून चोरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

त्र्यंबक रोडवरील गोल्फ क्लब येथील जॉगिंग ट्रॅक, जलतरण तलाव येथे येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांच्या काचा फोडून चोरट्यांनी किमती ऐवज लंपास केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, सरकारवाडा पोलिस ठाण्यात मोबाइल गहाळ झाल्याची तक्रार नोंदवल्याने तो चर्चेचा विषय झाला आहे.

शरीर स्वास्थ जपणाऱ्या नागरिकांना गोल्फ क्लब मैदानासह जलतरण तलाव दररोज सकाळी आकर्षिक करत असतो. त्यामुळे या ठिकाणी नियमित येणाऱ्यांची संख्या वाढती असते. त्यातच रविवारी (दि.२०) सुट्टी असल्याने नागरिकांची पहाटेपासून गर्दी होती. नागरिकांनी त्यांच्याकडील वाहने गोल्फ क्लब परिसर, टिळकरोड, त्र्यंबकरोडवर लावली होती. दरम्यान, रविवारी (दि.२०) सकाळी या परिसरात लावलेल्या आठ ते दहा चारचाकी वाहनांच्या काचा चोरट्यांनी फोडल्याचे आढळून आले. कारमालकांनी कारची पाहणी केली असता त्यातील किमती ऐवज लंपास झाल्याचे आढळून आले. मुंबईनाका पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार श्‍वेता समीर भिडे यांनी शासकीय विश्रामगृहालगत असलेल्या गोल्फ क्लब मैदानाच्या रस्त्यावर त्यांची एमएच १५ एचक्यू ९७२१ क्रमांकाची कार पार्क केली होती. या कारची काच फोडून चोरट्यांनी कारमधील सॅमसंगचा मोबाइल, जॅकेट आणि लेदरची बॅग लंपास केली.

तर राजेंद्र खरात यांच्या एमएच ०६ एडी ७७०१ क्रमांकाच्या कारची काच फोडून चोरट्यांनी कारमधील ५ हजारांची रोकड, जॅकेट चोरून नेले. स्वप्निल सुधाकर येवले यांच्याकडील एमएच १५ बीएक्स ४७७६ क्रमांकाच्या कारची काच फोडून १० हजार रुपयांची रोकड व जॅकेट तर, प्रवीण कुमार यांच्या एमएच १५ बीएक्स ५२९९ क्रमांकाच्या कारची काच फोडून चोरट्यांनी साडेतीन हजार रुपयांची रोकड चोरून नेली. या प्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

The post Nashik : त्र्यंबकरोडवर वाहनांच्या काचा फोडून किमती ऐवज केला लंपास appeared first on पुढारी.