Nashik : नगरपालिकांतही ठाकरे गट फुटीच्या उंबरठ्यावर

शिंदे गट ठाकरे गट,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने नाशिक महापालिकेतील १२ माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश करत ठाकरे गटाला जोरदार धक्का दिला आहे. या प्रवेश सोहळ्यानंतर जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये पक्षांतराच्या कुंपणावर असलेल्या नगरसेवकांचा मार्ग खुला झाला आहे. लवकरच तेथेही ठाकरे गट फुटेल अशी अटकळ बांधली जात आहे.

राज्यात जुलैअखेरीस सत्तांतर होऊन मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना व भाजपचे सरकार अस्तित्वात आले. सरकार स्थापनेनंतर ठाकरे गटाचे राज्यभरातील प्रमुख नेते व पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. पण, चार महिन्यांत नाशिकमध्ये ठाकरे गटाला हादरा देण्यात शिंदे गट म्हणावा तेवढा यशस्वी झाला नव्हता. त्यामुळे नाशिक हा आमचा बालेकिल्ला असल्याची गर्जना ठाकरे गटाकडून केली जात होती. मात्र, शिंदे गटाने गुरुवारी (दि.१५) मध्यरात्री नाशिक मनपातील १२ माजी नगरसेवकांचा एकाचवेळी पक्षप्रवेश करत ठाकरे गटाच्या उरल्या सुरल्या गडाला भगदाड पाडले. या प्रवेशासोबत नगरपालिकांमध्येही पक्षांतराचे वारे जोरदार वाहू लागल्याची चर्चा आहे.

जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांपैकी गेल्या पंचवार्षिकमध्ये मनमाड, नांदगाव, इगतपुरी, भगूर, व सिन्नर या नगरपालिकांमध्ये शिवसेनेची सत्ता होेती. राज्यातील सत्ता बदलानंतर अनेक माजी नगरसेवक शिंदे गटात प्रवेशासाठी उत्सुक होते. पण, जिल्ह्यातून पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे व आ. सुहास कांदे वगळता ठाकरे गटाचा कोणताही मोठा नेता अथवा पदाधिकारी शिंदे गटात प्रवेशकर्ता झालेला नव्हता. त्यामूळे नऊ नगरपालिकांमधील माजी नगरसेवकांमध्ये प्रवेशावरून व्दिधा मन:स्थिती होती. परंतु, नाशिक महापालिकेतील माजी १२ नगरसेवक शिंदे गटात सहभागी झाले आहेत. त्यामुळे या लोकप्रतिनिधींच्या पावलावर पाऊल ठेवत नगरपालिकांमधील माजी नगरसेवक लवकरच शिंदे गटाच्या तंबूत दाखल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या उर्वरित सत्तेला सुरूंग लागू शकतो.

हेही वाचा :

The post Nashik : नगरपालिकांतही ठाकरे गट फुटीच्या उंबरठ्यावर appeared first on पुढारी.