Nashik : नवरात्रोत्सवामुळे वणीत उत्साह पर्व, यंदा दीड हजार महिला घटी बसणार

जगदंबा माता वणी,www.pudhari.news

वणी : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
जगदंबामाता शारदीय नवरात्रोत्सवास सोमवारी (दि. 26) प्रारंभ होत असून, यासाठी वणीकरांची तयारी पूर्ण झाल्याची माहिती वणी जगदंबा ट्रस्टच्या वतीने देण्यात आली. कोरोनामुळे मागील दोन वर्षे नवरात्रोत्सवात खंड पडला होता. यंदा निर्बंधमुक्त वातावरणात नवरात्रोत्सव होत आहे. त्यामुळे उत्साहाचे वातावरण आहे.

दोन वर्षांच्या खंडानंतर दीड हजारांवर भाविक महिला नवरात्रोत्सवात घटी बसणार असून, या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी जगदंबादेवी मंदिरासमोर सुमारे 1,800 महिला भाविक नऊ दिवस घटी बसतात. सलग दोन वर्षे कोविड निर्बंधांमुळे भाविक महिला जगदंबामाता मंदिरासमोर घटी बसू शकल्या नव्हत्या. यावेळी भाविक महिला मोठ्या संख्येने घटी बसण्याची शक्यता आहे. त्यासाठी सप्तशृंगीदेवी ट्रस्टने तयारी सुरू केली असून, घटी बसणार्‍या महिलांसाठी वॉटरप्रूफ सभामंडप टाकण्यात आला आहे. नवरात्रोत्सवात मंदिर व गावांत 24 तास वीजपुरवठा सुरळीत असावा, अशी मागणी महावितरणच्या अधिकार्‍यांकडे ट्रस्टने केली आहे. घटी बसणार्‍या महिलांची वैद्यकीय तपासणी व आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी पांडाणे प्राथमिक आरोग्य केंद्राने वैद्यकीय अधिकार्‍यांची नियुक्ती केली आहे. भाविकांना मोफत औषधोपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कायदा व सुव्यवस्था व भाविकांच्या सुरक्षितेच्या द़ृष्टीने वणी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक स्वप्निल राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पुरेशा बंदोबस्तासाठी पोलिस कर्मचारी, गृहरक्षक दलाच्या जवानांची नेमणूक करण्यात येणार आहे.

सार्वजनिक उत्सव मंडळे, बसस्थानक आदी गर्दीच्या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

पाच लाख भाविकांची शक्यता
नवरात्रोत्सवात पाच लाखांवर भाविक येण्याची शक्यता असून, त्याद़ृष्टीने भाविकांना सोयी-सुविधा पुरविण्याकामी ट्रस्टचे विश्वस्त, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, पोलिस व आरोग्य प्रशासन, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.

दररोज दुपारी संगीतमय प्रवचनमाला
नवरात्रोत्सव काळात दररोज सकाळी 7 वाजता पंचामृत महापूजा सकाळी 9 वाजता आरती, सायंकाळी 6 वाजता देवीची सवाद्य पालखी, 7 वाजता महाआरती होईल. नाशिकचे भागवताचार्य रामेश्वर महाराज महाजन यांचे देवी सभामंडपात 27 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबरदरम्यान दररोज दुपारी 1 ते 5 यावेळेत श्रीमद् देवी भागवत महात्म्यावर संगीतमय प्रवचनमाला होणार आहे. उत्सवकाळात दररोज रात्री 8 ते 11 या वेळेत वेगवेगळ्या प्रसिद्ध भजनी मंडळांचा भक्तिसंध्येचा कार्यक्रम होणार आहे. महानवमी (ता. 4) ला मंदिर सभामंडपात रात्री 8.30 पासून शतचंडी याग होईल. रात्री 12 नंतर कोहळ्याचा बळी देऊन पूर्णाहुती देण्यात येणार आहे.

हेही वाचा :

The post Nashik : नवरात्रोत्सवामुळे वणीत उत्साह पर्व, यंदा दीड हजार महिला घटी बसणार appeared first on पुढारी.