Nashik : नांदगावचे मंडल अधिकारी पैठणकर निलंबित, अवैध खडीक्रशर प्रकरण भाेवले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नांदगाव येथील गणेशनगरमधील अवैध खडीक्रशर प्रकरणात मंडल अधिकारी बी. एन. पैठणकर यांना निलंबित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी ही कारवाई केल्याने महसूल विभागामध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणी अधिकाऱ्याचे निलंबन झाले असले, तरी प्रशासन अवैध उत्खनन करणाऱ्या खडीक्रशरचालकांवर कारवाईस धजावणार का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

मालेगावचे अपर जिल्हाधिकारी माया पाटोळे व जिल्हा गौण खनिज विभाग यांच्या संयुक्त पथकाने बुधवारी (दि. १४) गणेशनगरमधील गट क्रमांक १/१७ येथे सहा महिन्यांपासून अवैधपणे सुरू असलेल्या क्रशरवर कारवाई केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार झालेल्या या कारवाईत या ठिकाणचा वीजपुरवठा खंडित करतानाच तेथे किती खोदाई करण्यात आली. याची सविस्तर माहिती प्रशासनाकडून गोळा करण्यात आली. त्यामुळे तालुक्यात ही कारवाई चर्चेचा विषय ठरली असली, तरी यानिमित्ताने अनेक प्रश्न उभे ठाकले होते.

सहा महिन्यांपासून क्रशरचालक अवैधपणे उत्खनन करत असताना स्थानिक प्रशासन काय करत होते? नाशिकचे पथक थेट नांदगावला जाऊन कारवाई करत असताना तेथील तहसीलदारांना उत्खननाबाबत माहिती नसेल का, असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रश्नांचे मोहोळ शांत झालेले नसतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी या अधिकाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे.

नांदगावचे मंडल अधिकारी पैठणकर यांना या प्रकरणात निलंबित केले आहे. परंतु, या घटनेत घाईघाईत अधिकाऱ्यावर कारवाईचा निर्णय घेणाऱ्या प्रशासनाने अद्यापही क्रशरचालकाला साध्या दंडाची नोटीसही बजावलेली नाही. त्यामुळे या प्रकरणात प्रशासन संबंधित क्रशर चालकाला पाठीशी घालते आहे का, अशी शंका यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

हेही वाचा :

The post Nashik : नांदगावचे मंडल अधिकारी पैठणकर निलंबित, अवैध खडीक्रशर प्रकरण भाेवले appeared first on पुढारी.