Nashik : नांदगाव अवैध क्रशर प्रकरणात मंडल अधिकाऱ्यानंतर तलाठी निलंबित

निलंबित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नांदगाव येथील अवैध खडीक्रशर प्रकरणात मंडल अधिकाऱ्यानंतर आता तालुक्यातील पिंपरखेडचे तलाठी जयेश मलदुडे यांना कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत निलंबित करण्यात आले. परंतु, जागेवर तब्बल ३ हजार ५७१ ब्रास अवैधपणे उत्खनन करणाऱ्या क्रशरचालकाला केवळ ३ कोटी ४२ लाखांची दंडात्मक नाेटीस बजावल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर शंका उपस्थित केली जात आहे.

नांदगावच्या गणेशनगर भागात आठवडाभरापूर्वी मालेगावच्या अपर जिल्हाधिकारी माया पाटोळे आणि जिल्हा गौणखनिज विभाग यांच्या संयुक्त पथकाने कारवाई करत अवैध क्रशर सील केले. तब्बल सहा महिन्यांपासून अवैधपणे चालविल्या जाणाऱ्या या क्रशरवर थेट नाशिकच्या पथकाने कारवाई केल्याने सर्वत्र खळबळ उडाली. गौण खनिज विभागाने केलेल्या पाहणीत या ठिकाणाहून ३ हजार ५७१ ब्रास उत्खनन विनापरवानगी झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणी चार दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्या आदेशान्वये मंडल अधिकारी बी. एन. पैठणकर यांना निलंबित करण्यात आले. त्यानंतर पिंपरखेडचे तलाठी मलदुडे यांनाही निलंबित करण्यात आले. येवल्याच्या प्रभारी प्रांत अर्चना पठारे यांनी निलंबनाचे आदेश काढताना त्यात अवैध क्रशरसह अन्य बाबतीत कामात हलगर्जीपणाचे कारण देत ही कारवाई केली.

प्रशासनाने क्रशर प्रकरणी दोन अधिकाऱ्यांवर कारवाई केली असताना सहा महिन्यांपासून अवैधपणे उत्खनन करणाऱ्या क्रशरचालकांना केवळ दंडाची नोटीस बजावली आहे. वसंत बाविस्कर व अन्य ११ जणांना ही नोटीस बजावली असून, त्यात बाजरमूल्याच्या पाचपट दंड ३ कोटी २१ लाख ४० हजार ५०३ रुपये बजावला आहे. तर स्वामित्वधन २१ लाख ४२ हजार ७०० रुपये असे एकूण ३ कोटी ४२ लाख ८३ हजार २०३ रुपयांचा दंड करताना मंगळवार (दि. २७) पर्यंत खुलाशासाठी मुदत देण्यात आली आहे. या प्रकरणात प्रशासनाने दोन्ही अधिकाऱ्यांबरोबरच क्रशरचालकावर कठोर कारवाई करणे अपेक्षित होते. परंतु, चालकाला केवळ दंडात्मक नोटीस बजावण्याचे सोपस्कार पार पाडणारे प्रशासन कोणाच्या दबावाखाली काम करते आहे, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा :

The post Nashik : नांदगाव अवैध क्रशर प्रकरणात मंडल अधिकाऱ्यानंतर तलाठी निलंबित appeared first on पुढारी.