Nashik : नांदूरमध्यमेश्वर’ला ३५० पक्ष्यांचे रिंगिंग

नांदुरमध्यमेश्वर अभयारण्य,www.pudhari.news

नाशिक : नितीन रणशूर

महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळख असलेल्या नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात येणाऱ्या पक्ष्यांच्या हवाई उड्डाणमार्गाचा नकाशा तयार करण्यासह पर्यटनवृध्दीसाठी तसेच संशोधनासाठी ‘बर्ड रिंगिंग’चा निर्णय नाशिक वन्यजीव विभागाने घेतला आहे. त्यानुसार आतापर्यंत सुमारे ३५० पक्ष्यांची रिंगिंग प्रक्रिया पुर्ण करण्यात आली असून, त्यामध्ये पाणथळ, गवताळ आणि वृक्षांवरील पक्ष्यांचा समावेश आहे. बर्ड रिंगिंगमुळे विदेशी पाहुण्याचा स्थलांतराचा मार्ग शोधणे शक्य होणार आहे.

थंडी चाहूल लागताच सातासमुद्रा पार करून देश-विदेशातील २६५ प्रजातींचे पाहुणे नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात येत असतात. पाच महिन्यांच्या पाहुणचारानंतर हे पाहुणे मायदेशी परतात. पक्ष्यांच्या स्थलांतराचे कुतूहल साऱ्यांनाच असते. त्याचाच शोध घेण्यासाठी नाशिक वन्यजीव विभागाने ‘बर्ड रिंगिंग’चा पर्याय निवडला आहे. त्याबाबतचा प्रस्ताव तीन वर्षांपुर्वी तयार करण्यात आला होता. ‘सेंट्रल एशियन फ्लाईवे’ उपक्रमांतर्गत गेल्या वर्षभरापासून नांदूरमध्यमेश्वरला बर्ड रिगिंग केले जात आहे.

स्थलांतरित पक्ष्यांच्या ये-जा करण्याच्या हवाई मार्गाचा नकाशा बनविण्यासाठी बर्ड रिगिंग करण्यासाठी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी अर्थात ‘बीएनएचएस’च्या संशोधकांची मदत घेतली जात आहे. बीएनएचएसच्या वतीने नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यातील वनरक्षक, गाईड, पक्षीप्रेमी तसेच स्वयंसेवकांना मार्गदर्शन करतानाच पाणथळ, गवताळ अधिवासाचे महत्व, पक्षी निरीक्षण, पक्षी ओळख, प्रगणना, माळरानातील पक्षीजीवन आदींचे धडे देण्यात आले आहे. दरम्यान, दुर्मिळ कांड्या करकोचा या पक्ष्याचे रिंगिंगसोबतच बॅडिंग करण्यात आले आहे. त्यामुळे त्याचे दूरूनही निरीक्षण नोंदविता येणार असल्याचे वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी सांगितले.

गेल्या वर्षी वन्यजीव विभागाकडून बर्ड रिंगिंगची रंगीत तालिम घेतली होती. बीएनएचएसच्या संशोधकांच्या मदतीने रिंगिंग प्रक्रिया पुर्ण करण्यात येत आहे. रिंगिंगमुळे स्थालांतराचा मार्ग, निरीक्षण, रेकॉर्ड तसेच स्थानिक तसेच विदेशी पक्ष्यांचा अभ्यास करणे शक्य होणार आहे. त्याआधारे आवश्यक उपाययोजना केल्या जातील.

-शेखर देवकर, वनपरिक्षेत्र अधिकारी,नांदूरमध्यमेश्‍वर पक्षी अभयारण्य

हेही वाचा :

The post Nashik : नांदूरमध्यमेश्वर'ला ३५० पक्ष्यांचे रिंगिंग appeared first on पुढारी.