Nashik : नाराज डॉ. भारती पवारांनी दिला उपोषणाला बसण्याचा इशारा

भारती पवार,www.pudhari.news

नाशिक (सुरगाणा) : पुढारी वृत्तसेवा

आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांपासून लाभार्थींना वंचित ठेवले जात असेल, तर मलाच उपोषणाला बसावे लागेल. कर्मचारी, अधिकारी सरकारचा पगार घेतात, तर किमान कामाचे भान ठेवावे, असे डोस केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी कर्मचाऱ्यांना दिले.

आढावा बैठकीत उपजिल्हाधिकारी रवींद्र परदेशी, अपर आयुक्त संदीप गोलाईत, कळवणचे सहायक जिल्हाधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर, तहसीलदार सचिन मुळीक, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहते, तालुका वैद्यकीय अधिकारी दिलीप रणवीर, एन. डी. गावित, रमणगिरी महाराज, रमेश थोरात आदी उपस्थित होते.

आढावा बैठकीत सर्वप्रथम आरोग्य विभागाचा आढावा घेण्यात आला. यामध्ये नागरिकांनी आरोग्यविषयक समस्यांचा पाढाच नागरिकांनी आरोग्यमंत्र्यांपुढे वाचला. यामध्ये बालमृत्यू दर, मातामृत्यू दर, प्रसूतीकरिता नाहक नाशिकला पाठवले जाणे, पांगारणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदे भरावी, अंबाठा-कुकुडणे उपकेंद्रात आरोग्य सुविधांची वानवा, उंबरठाणला रुग्णवाहिका नसणे आदी तक्रारींचा पाऊस पडला. तालुक्यातील ६६ वाड्या-वस्त्या अद्यापही वीजपुरवठ्यापासून वंचित आहेत. जुने विजेचे खांब बदलण्याची मागणी नागरिकांनी केली.

कळवण प्रकल्प कार्यालयाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करीत मागील वर्षीच्या अर्थसंकल्पातील १७ हजार ७१६ शिष्यवृत्ती लाभार्थी विद्यार्थ्यांपैकी दोन हजार विद्यार्थी अद्यापही शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित आहेत. थेट खात्यावर रक्कम हस्तांतर योजनेच्या माध्यमातून शिष्यवृत्ती दिली जाते. या तक्रारीनंतर ना. पवार म्हणाल्या की, विद्यार्थ्यांना वंचित ठेवत अन्याय करू नका. देशाला सर्वांनी मिळून पुढे न्यायचे आहे. कारणे नको कामे करा, असे खडे बोल त्यांनी सुनावले.

भरत भोये यांनी महिला बचत गटांना अनुदान देण्यात आले पाहिजे, अशी मागणी केली. शबरी आवास योजनेची सुरगाणा तालुक्यात १०५३ घरे, तर कळवण तालुक्यात ८५३ घरे मंजुरी दिली आहे. खुंटविहीर येथील शासकीय आश्रमशाळेतील लाखो रुपयांचा रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प धूळ खात पडून असल्याचे आनंदा झिरवाळ यांनी सांगितले. शांताराम महाले यांनी पांगारणे येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक देण्याची मागणी केली. जलजीवन मिशनच्या पाणीपुरवठा योजनेविषयी चर्चा करण्यात आली.

तालुक्यात चक्रीवादळाने घरांची पडझड झाली तसेच विजेमुळे जनावरे दगावली आहेत. कांदा, आंबा याबाबत झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले. या दौऱ्यादरम्यान सुरगाणा फिल्ड रुग्णालयाचे उद्घाटन, भोरमाळ, अंबाठा, काठीपाडा, उंबरठा प्राथमिक आरोग्य केंद्र भूमिपूजन केल्यानंतर खोकरी, निंबारपाडा येथे घरांचे नुकसानीची पाहणी त्यांनी रात्री केली.

हेही वाचा : 

The post Nashik : नाराज डॉ. भारती पवारांनी दिला उपोषणाला बसण्याचा इशारा appeared first on पुढारी.