Nashik : नाशिकच्या सराफ बाजाराविषयी थोडसं…

नाशिक सराफ बाजार,www.p[udhari.news

नाशिक : 

गोदावरीच्या काटावर वसलेल्या नाशिकला हजारो वर्षांची पौराणिक व ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. येथील धार्मिक स्थळे पाहिल्यावर माणसाला पुरातन काळाचे महत्व कळते. त्यासोबतच नाशिकच्या व्यापार उद्योगाचा इतिहासही अतिशय प्राचीन आहे.  विविध प्रकारचे व्यवसायांबरोबरच सोने-चांदी व रत्ने यांचाही व्यवसाय येथे शतको वर्षापासून चालू आहे. पेशवाई काळात नाशिकला उपराजधानीचा दर्जा मिळाल्याने इ.स.१७२५ नंतर नाशिकची भरभराट झाली. हाच काळ नाशिकच्या सराफी व्यावसायाला पोषक ठरला. याच काळात नाशिकचा सराफी व्यावसाय जोमाने वाढला. परंपरागत सोन्याच्या दागिण्यांबरोबरच चांदीचा भांडीमाल व इतर वस्तूंचे उत्पादनही येथे होऊ लागले. यातूनच नाशिक हे शुद्ध चांदीची बाजारपेठे म्हणून देशभर नावारूपाला आले.

नाशिकमध्ये आजमितीला लहान -मोठी हजाराच्यावर सराफी दुकाने आहेत. या दुकानांतून सोने व चांदीची करोडो रुपयांची उलाढाल वर्षभरात होत असते. नाशिकचा सराफ बाजार हा नाशिकचा अलंकार आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

कान टोचण्याची परंपरा 

नाशिककरांनी पिढ्यानपिढ्या सराफ बाजातून सोने खरेदीची परंपरा आजही कायम राखली आहे. त्यातूनच येथील व्यवसाय भरभराटीला आला आहे. येथील सोने व्यवसायाला तीनशे वर्ष पूर्ण झाली आहे. येथील सराफ बाजाराची उलाढाल आज करोडो रुपयांच्या घरात आहे. सोने खरेदी बरोबरच अगदी कुटुंबातील प्रत्येकाने याच सराफ बाजारात आपले कान टोचले आहेत. आजही ही परंपरा कायम आहे. अगदी विश्वासाने नाशिककर या बाजारातून आपले कान टोचून घेत असतात.

शंभर टक्के चांदीची शुद्ध परंपरा

नाशिकच्या चांदीने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. शंभर टक्के शुद्धता हे येथील चांदीचे वैशिष्ट आहे. ताट वाटी, तांब्या, पूजे अर्चेतील चांदीची भांडी येथे बनविली जातात. इतकेच नव्हे तर कलाकुसरीच्या वस्तूही बनविल्या जातात. येथे घडविण्यात आलेल्या चांदीच्या मूर्ती व भांडी यांना देशभरातून मागणी असते. दरवर्षी यातून शेकडो कोटींची उलाढाल होत असते.

ओतीव काम करून तयार केलेल्या देव-देवतांच्या भरीव मूर्ती हे या बाजाराचे वैशिष्ट आहे. नाशिकच्या कारागिरांनी संत श्री. निवृत्ति नाथांचा संपूर्ण चांदीत घडविलेला २३० किलोंचा रथ 900 जणांनी अविरत काम करून बनविला. तसेच, पंढरपूर मधील उत्सवमूर्ती, सप्तशृंगी देवीचा गाभारा, नाशिकच्या कालिका मंदिराचा गाभार हा नाशिकच्याच कारागिरांनी घडविला.

धर्मकाटा एक सेवाधर्म

विक्रेता आणि खरेदीदार यांच्यातील सोन्याचांदीचे व्यवहार अधिक विश्वासाने होणे आवश्यक असते. हीच विश्वासार्हता टिकून राहावी म्हणून सराफ बाजारातील धर्मकाटा स्थापना १८९२ मध्ये झाली. ग्राहकांसाठी असलेला हा एकमेव असा धर्मकाटा आहे की जो सराफ असोसिएशनतर्फे चालविला जातो. साधारणता १८९२ साली परचुरे यांचा धर्मकाटा या ठिकाणी होता. कालांतराने हा नाशिक सराफ असोसिएशनने घेतला व २३ डिसेंबर १९३५ रोजी धर्मकाटा या नावाने तो सुरू केला. तेव्हापासून धर्मकाटा ही संकल्पना सराफ असोसिएशनतर्फे एक सेवाधर्म म्हणून राबविली जात आहे. विक्रेता आणि खरेदीदार यांच्यातील सोन्याचांदीचे व्यवहार अधिक विश्वासाने होत राहण्यासाठी सराफ बाजारातील धर्मकाटा हा महत्त्वाचा दुवा ठरतो आहे.

The post Nashik : नाशिकच्या सराफ बाजाराविषयी थोडसं... appeared first on पुढारी.