Nashik : निफाडचा अक्षय देशात दुसरा, भाभा अनुसंशोधन केंद्र परीक्षेत मिळवलं यश

अक्षय गुप्ता,www.pudhari.news

निफाड (जि. नाशिक) : (दीपक श्रीवास्तव) 

निफाड तालुक्यातील द्राक्षांकरता प्रख्यात असलेल्या शिवडी या अतिशय छोट्या खेडेगावातील अक्षय शांतीलाल गुप्ता या 27 वर्षीय तरुणाने आपली बुद्धिमत्ता व परिश्रमाच्या बळावर देशातील संशोधन क्षेत्रात अग्रमानांकित असलेल्या भाभा अणुसंशोधन केंद्र द्वारे घेण्यात आलेल्या निवड परीक्षेमध्ये देशात द्वितीय क्रमांकावर येण्याचा बहुमान पटकावला आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र त्याचे कौतुक केले जात आहे.

अक्षयने मिळवलेल्या या प्रशासनीय यशाबद्दल त्याच्याशी बातचीत केली असता, कितीही अवघड व प्रतिकूल परिस्थिती असली तरी आपला निर्धार पक्का असेल तर आपल्याला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही याचे अक्षय हा जिवंत उदाहरण ठरू शकतो.

अक्षय चे बालपण हे अतिशय गरीबीत व प्रतिकूल परिस्थितीत गेले आहे. शाळा न शिकलेल्या निरक्षर आईने मोलमजुरी करून अक्षय आणि त्याच्या दोन भावंडांना लहानचे मोठे केले. मला शिकता आले नसले तरी माझ्या मुलांनी जास्तीत जास्त शिकून मोठे व्हावे हीच त्या माऊलीची इच्छा होती. आईचे कष्ट बघत मोठे झालेल्या अक्षयने देखील प्रचंड कष्ट करीत प्रत्येक वर्गात आपला पहिला क्रमांक टिकून ठेवला. दहावीच्या परीक्षेत देखील त्याने 93 टक्के मार्क मिळवून  केंद्रात पहिले स्थान मिळवलेले होते. पहिली ते चौथीपर्यंत चे त्याचे शिक्षण  शिवडीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले तर पाचवी ते दहावी पर्यंतचे माध्यमिक शिक्षण त्याने उगावच्या छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयात पूर्ण केले. त्या नंतर जवळच्याच रानवड येथील कर्मवीर काकासाहेब वाघ कनिष्ठ महाविद्यालयातून त्याने अकरावी आणि बारावीचे शिक्षण पूर्ण केले. बारावी आणि सीईटी मध्ये चांगले गुण मिळाल्यामुळे त्याला नांदेड येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळाला. स्थापत्यशास्त्रामध्ये बी टेक ची पदवी देखील त्याने चांगल्या गुणांनी पटकावली. या परीक्षेत त्याला रौप्य पदक मिळालेले होते. सर्वात विशेष म्हणजे या संपूर्ण शैक्षणिक कारकिर्दी मध्ये त्याने कुठेही खाजगी क्लासेस किंवा ट्युशन यांचा आधार घेतला नाही. या संपूर्ण वाटचालीमध्ये त्याचे मोठे मामा स्वर्गवासी हनुमंत बसप्पा कानडे आणि त्यांचे दोन्ही बंधू रामदास आणि अंबादास कानडे यांनी अक्षयला खूप मोलाची मदत केली. त्याचा धीर खचणार नाही याकडे लक्ष दिले. त्यामुळे आपली आई ही आपले प्रेरणास्थान आहे तर तीनही मामा आपले आधारस्तंभ आहेत असे तो अतिशय आग्रहपूर्वक नमूद करतो.

निफाड येथील नगरपंचायतीच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या स्वातंत्र्य सैनिक बा. य. परीट गुरुजी अभ्यासिकेमध्ये तो सकाळी पहाटे पाच वाजेपासून रात्री अकरा पर्यंत अभ्यासाचे कष्ट उपसत असतो. कोणत्याही परीक्षेमध्ये किंवा क्षेत्रामध्ये कुठल्याही प्रकारचे आरक्षण नसताना देखील खुल्या प्रवर्गातून त्याने हे उज्वल यश संपादन केलेले आहे. महाराष्ट्र राज्याच्या जलसंपदा विभागाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेमध्ये देखील त्याने आपली तयारी जोखून पाहिलेली आहे याचा देखील निकाल नक्कीच चांगला येईल असा त्याला दांडगा विश्वास आहे.

अतिशय ग्रामीण भागातून व गरीब परिस्थितीतून देखील चांगला अभ्यास केला आणि योग्य नियोजन केले तर यश मिळणे अवघड नाही याची विद्यार्थ्यांनी खात्री बाळगावी असा मोलाचा संदेश त्याने या निमित्ताने दिला.

हेही वाचा :

The post Nashik : निफाडचा अक्षय देशात दुसरा, भाभा अनुसंशोधन केंद्र परीक्षेत मिळवलं यश appeared first on पुढारी.