Site icon

Nashik : निफाडमधील मुलीचे अपहरण लव्ह जिहादचाच प्रकार : किरीट सोमय्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

निफाड तालुक्यातील १८ वर्षीय मुलीस फूस लावून परराज्यात नेले. सुदैवाने ग्रामीण पोलिसांनी तपास करून मुलीची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका केली व मुलीचा ताबा पालकांना दिला आहे. हा लव्ह जिहादचाच प्रकार असून, मुलीस फूस लावून पळवून नेणाऱ्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे माजी खा. किरीट सोमय्या यांनी केली.

सोमय्या यांनी ग्रामीण पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांची भेट घेत कारवाईची मागणी केली. सोमय्या यांनी केलेल्या आरोपानुसार, निफाड तालुक्यातील नुकतीच १८ वर्षे पूर्ण केलेली एक मुलगी गावातील युवकाबरोबर पळून गेली होती. विशेष म्हणजे मुलीला पळविणारा २४ वर्षीय तरुण विवाहित असून, त्याला दोन मुले आहेत. त्याने मुलीला फूस लावून अजमेर येथे नेले. तेथे तिला तावीज बांधले. याबाबत ग्रामीण पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने तपास करून ४८ तासांत मुलीची सुटका करून तिला पालकांच्या ताब्यात दिले. युवकावर कठोर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी मुलीच्या पालकांसह सोमय्या यांनी पोलिसांकडे केली आहे. हा लव्ह जिहादचा प्रकार असून, याबाबत उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही तक्रार केल्याचे सोमय्यांनी सांगितले. यावेळी आ. देवयानी फरांदे, भाजपचे माजी शहराध्यक्ष गिरीश पालवे उपस्थित होते.

महापालिकेतील अर्धा डझन अधिकाऱ्यांना नोटीस

मुंबईतील मोकळ्या भूखंडावर रवींद्र वायकर यांचा ताबा असून, ते उद्धव ठाकरे यांचे भागीदार आहेत. तेथे ५०० कोटी रुपयांचे हाॅटेल बांधकाम सुरू असून, ठाकरे सरकारने या बांधकामास परवानगी दिली आहे. याबाबत मी तक्रार केली होती. मुंबई महापालिकेतील अर्धा डझन अधिकाऱ्यांना नोटीस दिली आहे. नगरविकास खात्याची चौकशी सुरू झाली असल्याचे किरीट सोमय्या यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा : 

The post Nashik : निफाडमधील मुलीचे अपहरण लव्ह जिहादचाच प्रकार : किरीट सोमय्या appeared first on पुढारी.

Exit mobile version