Nashik : निफाड मल्टिमॉडेल लॉजिस्टिक पार्कला लवकरच मंजुरी

निफाड ड्रायपोर्ट,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

निफाड ड्रायपोर्टमधील सर्व तांत्रिक अडचणी दूर झाल्या असून, मल्टिमॉडेल लॉजिस्टिक पार्कच्या धर्तीवर ते विकसित करण्यात येणार आहे, अशी माहिती जवाहरलाल नेहरू पोर्ट अॅथाॅरिटीचे (जेएनपीए) अध्यक्ष संजय सेठी यांनी दिली. या पार्कमुळे नाशिकच्या कृषी व औद्योगिक क्षेत्राचा झपाट्याने विकास होताना महिन्याकाठी किमान १० हजार कंटेनरची वाहतूक अपेक्षित असल्याचे सेठी यांनी सांगितले.

जेएनपीएने नाशिकमध्ये शुक्रवारी (दि.२४) इन्व्हेस्टर कॉनक्लेव्ह-२०२३ चे आयोजित केली. या परिषदेच्या निमित्ताने सेठी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कृषी व औद्योगिक क्षेत्रातील विकासात नाशिकला मोठा वाव आहे. महिन्याकाठी येथून होणारी आयात-निर्यात बघता येथील उत्पादित मालाला कमी वेळेत आणि परवडणाऱ्या दरांमध्ये जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी जेएनपीएचा प्रयत्न आहे.

निफाडला मल्टिमॉडेल लॉजिस्टिक पार्क अडथळे दूर करण्यात झाले आहेत. शासनाकडून लवकरच प्रकल्पाला मान्यता मिळवून दोेन वर्षांत हे पार्क कार्यान्वित होईल, असा विश्वास सेठी यांनी व्यक्त केला. हे पार्क रेल्वे आणि रस्ते मार्गाला जोडले जाणार असून, तेथे सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच हे पार्क थेट जेएनपीएशी जोडले जाणार असल्याने जलद आणि कमी खर्चात नाशिकच्या कृषी तसेच अन्य उत्पादन मालाला जागतिक बाजारपेठ उपलब्ध होईल, असे सेठी म्हणाले. याप्रसंगी जेएनपीएचे उपाध्यक्ष उन्मेश वाघ, मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन बोरवणकर, जनसंपर्क अधिकारी अंबिका सिंह आदी उपस्थित होते.

पार्कसाठी रेल्वेचे सहकार्य

निफाड येथे विकसित करण्यात येणाऱ्या मल्टिमॉडेल लॉजिस्टिक पार्कसाठी रेल्वेने सहकार्याची तयारी दर्शविली आहे. तेथील कंटेनर वाहतुकीसाठी समर्पित मालगाडी रेल्वेसेवा उपलब्ध करून देण्याची ग्वाही रेल्वेने दिली आहे. रस्ते कनेक्टिव्हिटीसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाशी करार झाल्याचे सेठी यांनी सांगितले.

सेझमध्ये गुंतवणुकीला वाव

जेएनपीएच्या पाच किलाेमीटर परिघात पोर्ट ट्रस्टवर आधारित पहिला एसईझेड (सेझ) प्रकल्प कार्यान्वित केला आहे. या सेझमध्ये एक-दोन हेक्टरपासून ते सहा हेक्टरपर्यत उद्योजकांना प्लॉट उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यासाठी ५०० कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. येथील सर्व परवानगी एक खिडकीद्वारे देण्यात येत असून, आतापर्यंत ४४ प्लॉट वितरित केले आहेत. नाशिकच्या उद्योजकांनी या सेझमध्ये गुंतवणूक करावी, असे आवाहन सेठी यांनी केले.

वाढवणसाठी पाठपुरावा

डहाणू तालुक्यात वाढवण बंदराच्या उभारणीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. केवळ पर्यावरणाशी संबंधित बाबी न्यायप्रविष्ट आहेत. त्यावर निर्णय झाल्यानंतर ४ वर्षांत पूर्ण क्षमतेने हे बंदर कार्यान्वित होईल. या बंदरातून २०४० पर्यंत २४ लाख मिलियन कंटनेर वाहतुकीचे उद्दिष्ट आहे. तसे झाल्यास जगातील पहिल्या १० मध्ये त्याचा समावेश होईल, अशी माहिती सेठी यांनी दिली.

– वर्धा, जालन्यानंतर नाशिकमध्ये लॉजिस्टिक पार्क उभारणी

– प्रकल्पासाठी २५० ते ३०० कोटींची खर्च अपेक्षित

– नाशिकमधून १० हजार कंटेनर हाताळणीचे उद्दिष्ट

– जेएनपीए, गुजरात बंदरावरून देशातील ७४ टक्के निर्यात

– जेएनपीएमधून वार्षिक १० लाख मिलियन कंटेनरची वाहतूक

– जेएनपीएचे खासगीकरण नाही, पीपीपी तत्त्वावर दिले

हेही वाचा : 

The post Nashik : निफाड मल्टिमॉडेल लॉजिस्टिक पार्कला लवकरच मंजुरी appeared first on पुढारी.