Nashik : निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या अंगावर उधळल्या नोटा, नाशिकरोड व्यापारी बॅंक निवडणूक वाद विकोपाला

नाशिकरोड व्यापारी बॅंक निवडणूक

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

येथील नाशिकरोड-देवळाली व्यापारी सहकारी बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी जाहीर करण्याच्या शेवटच्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकारी गौतम बलसाने यांनी पैसे घेऊन ५६ उमेदवारांचे अर्ज बाद केल्याचा आरोप करीत त्यांच्या अंगावर परिवर्तनच्या नेत्यांनी नोटांची उधळण केली. त्याचा निषेध म्हणून हे आंदोलन केल्याची माहिती विरोधी परिवर्तन पॅनलच्या नेत्यांनी प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना दिली.

निवडणूक निर्णय अधिकारी गौतम बलसाने यांनी न्यायालयाचा कुठलाही आदेश अथवा सूचना नसतानाही 56 उमेदवारांचे अर्ज बाद केले. हे अर्ज पैसे घेऊन बात केल्याचा आरोप परिवर्तन पॅनलच्या नेत्यांनी जाहीरपणे केला. त्याचा निषेध नोंदविण्यासाठी परिवर्तन पॅनलच्या सर्व नेते आणि कार्यकर्त्यांनी बलसाने यांच्या कार्यालयात गोंधळ घातला. 56 उमेदवारी अर्ज बाद का केले, असा सवाल बलसाने यांना विचारण्यात येत होता. मात्र, बलसाने हे परिवर्तन पॅनलच्या आरोपांना कुठल्याही प्रकारची दाद देत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे संतप्त झालेल्या परिवर्तनाच्या कार्यकर्त्यांनी बलसाने यांच्यावर नोटांची उधळण करीत निषेध नोंदविला.

याबाबत माहिती देताना अशोक सातभाई म्हणाले की, 56 अर्ज बाद केल्यामुळे निवडणूक एकतर्फी झाली आहे. सत्ताधारी पॅनलच्या फायद्यासाठी व त्यांना पूरक ठरेल, असा निर्णय निवडणूक अधिकारी बलसाने यांनी घेतला आहे. त्याचा निषेध म्हणून आम्ही उमेदवारी अर्ज माघार घेत असून, सत्ताधाऱ्यांना पुन्हा एकदा निवडून देत निषेध व्यक्त करीत आहोत.

बलसाने यांनी माझी पत्नी संगीता हेमंत गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज सर्व पूर्तता असतानाही बाद केला. त्याचा जाब विचारण्यासाठी मी आज येथे आलो. त्यानंतर मी प्रश्न केल्यावर त्यांनी माझ्या पत्नीचा अर्ज पुन्हा वैध ठरवून निवडणूक लढविण्यास पात्र असल्याचे सांगितले. यामागे नाशिकरोड-देवळाली व्यापारी बँकेतील एकनाथ कदम आणि निवडणूक निर्णय अधिकारी बलसाने यांचे साटेलोटे असून, भ्रष्ट यंत्रणा या निवडणुकीत कामाला असल्याचा आरोप हेमंत गायकवाड यांनी केला.

सहकारची आज बैठक

व्यापारी बँक निवडणुकीत 19 उमेदवार बिनविरोधपणे निवडून आलेल्या सहकार पॅनलची शुक्रवारी नाशिकरोड येथील निवडणूक कार्यालयात सायंकाळी पाच वाजता महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत बिनविरोध निवडून आलेल्या संचालकांचा सत्कार तसेच महिला गटातील दोन उमेदवारांच्या निवडणुकीची रणनीती आखली जाणार असल्याची माहिती पॅनलचे नेते दत्ता गायकवाड आणि निवृत्ती इंगळे यांनी दिली.

हेही वाचा :

The post Nashik : निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या अंगावर उधळल्या नोटा, नाशिकरोड व्यापारी बॅंक निवडणूक वाद विकोपाला appeared first on पुढारी.