Site icon

Nashik : पाथर्डी शिवारात बिबट्याचा धुमाकूळ ; वनविभागाने लावला पिंजरा

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

पाथर्डी शिवारात गेल्या चार ते पाच दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून, शनिवारी बिबट्याने शेळीवर हल्ला केला, तर गोठ्यात बांधलेल्या वासराला रविवारी फस्त केले. त्यामुळे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे वनरक्षक विजयसिंह पाटील यांच्या पथकाने परिसरात पिंजरा लावला.

पाथर्डी शिवारातील ऊर्जा मळ्यामध्ये शनिवारी (दि. 8) सायंकाळी बिबट्याने मळ्यात चरणाऱ्या शेळीवर हल्ला करून जखमी केले. तसेच रविवारी (दि. 9) रात्री 12 च्या सुमारास मधुकर लक्ष्मण पोरजे यांच्या मळ्यातील गोठ्यामध्ये असलेल्या वासरावर बिबट्याने हल्ला करीत त्यास तब्बल २०० मीटर लांब फरफटत नेल्याने वासराचा जागीच मृत्यू झाला. याची माहिती वनविभागाला मिळताच वनरक्षक रोहिणी पाटील यांनी ऊर्जा मळ्यात भेट देऊन पंचनामा केला. तसेच ग्रामस्थांसह आजूबाजूला असणाऱ्या रहिवाशांना गोठ्याला कुंपण करणे, रात्री घराच्या आजूबाजूस प्रकाश ठेवण्यासाठी लाइट लावणे, शेतात रात्री जाताना दोन ते तीन लोकांनी समूहाने जावे, सोबत मोबाइलमध्ये मोठ्या आवाजात गाणी लावावी, घरालगत ऊस, मका यासारखी पिके काही अंतरावर घेऊन लावणे, लहान मुलांना सायंकाळी ६ नंतर घराबाहेर अंधारात खेळू न देणे याबाबतच्या सूचना दिल्या.

यावेळी सोसायटीचे चेअरमन खंडेराव धोंगडे, त्रिंबक कोंबडे, बाळकृष्ण शिरसाट, धनंजय गवळी, दत्तात्रेय डेमसे, अभिमान जाचक, मोहन पोरजे, राहुल जाचक, विक्रम गवळी, गोकुळ चव्हाण, संजय जाचक, खंडू वलवे, बाबूराव डेमसे यांनी पिंजरा बसविण्याची मागणी केली होती. 

हेही वाचा : 

The post Nashik : पाथर्डी शिवारात बिबट्याचा धुमाकूळ ; वनविभागाने लावला पिंजरा appeared first on पुढारी.

Exit mobile version