Nashik : पोलिस भरतीला आता लेखी परीक्षेचे वेध

Police Uniform Allowance

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्यात पोलिस भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणी सुरू असून, नाशिक ग्रामीणमध्ये २० जानेवारीपर्यंत मैदानी चाचणी चालणार असून, त्यानंतर पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा होणार आहे. अद्याप लेखी परीक्षेची तारीख महासंचालक कार्यालयाने जाहीर केली नसली, तरी एका पदामागे दहा उमेदवार लेखी परीक्षेसाठी निवडले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

राज्यात १८ हजार ३३१ पदांसाठी भरतीप्रक्रिया राबवली जात आहे. त्यासाठी राज्यभरातून १४ लाखांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले आहेत. एकापेक्षा अधिक ठिकाणी अर्ज केल्याने उमेदवारांच्या अनुपस्थितीचे प्रमाण सर्वत्र सुमारे चाळीस टक्के आहे. राज्यातील काही पोलिस आयुक्तालय/अधीक्षक कार्यालयांमधील मैदानी चाचणी पूर्ण झाली आहे. नाशिक ग्रामीण पोलिस दलातील १६४ शिपाई व १५ चालक पदांसाठी सुरू असलेल्या मैदानी चाचणीत आत्तापर्यंत सरासरी ४० टक्के उमेदवार गैरहजर राहत असल्याचे समोर आले आहे. उमेदवारांनी एकापेक्षा अधिक ठिकाणी अर्ज केले असून, पसंतीक्रम ठरवून ते मैदानी चाचणीस हजर राहत आहेत.

त्यानुसार नाशिक ग्रामीणमध्ये आतापर्यंत ६५ टक्के उमेदवारांनी मैदानी चाचणी दिली आहे. येत्या २० जानेवारीपर्यंत मैदानी चाचणी प्रक्रिया सुरू राहणार आहे. मैदानी चाचणीत ५० टक्के गुण मिळवणाऱ्यांची प्रवर्गनिहाय यादी तयार करण्यात येणार आहे. त्यानुसार एका पदामागे किमान दहा उमेदवारांना लेखी परीक्षेत संधी दिली जाईल. त्यानुसार नाशिक ग्रामीणच्या १७९ पदांसाठी सुमारे अडीच ते तीन हजार उमेदवार लेखी परीक्षेच्या शर्यतीत असतील.

दरम्यान, सध्या उमेदवार गैरहजर राहत असल्याने लेखी परीक्षेपूर्वीच्या गुणवत्ता यादीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. मैदानी चाचणी पार करून पुढे जाणाऱ्या उमेदवारांची संख्या निम्म्यावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांमध्ये जास्त स्पर्धा राहणार आहे.

लेखी परीक्षेची तयारी

मैदानी चाचणीनंतर प्रत्येक रिक्त जागेमागे १० पात्र उमेदवारांची प्रवर्गनिहाय गुणवत्ता यादी केली जाईल. त्यानंतर लेखी परीक्षेचे वेळापत्रक लागणार असून, १०० गुणांची लेखी परीक्षा होणार आहे. लेखी परीक्षेसाठी ९० मिनिटांचा अवधी राहणार असून, मराठी भाषेतच परीक्षा होईल. मैदानी व लेखी परीक्षेतील गुण एकत्रित करून अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे.

हेही वाचा :

The post Nashik : पोलिस भरतीला आता लेखी परीक्षेचे वेध appeared first on पुढारी.