Nashik : बुद्ध मूर्तींची १०० रथांमधून मिरवणूक

बुद्ध मूर्ती मिरवणूक,www.pudhari.news

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि बीएमए ग्रुपकडून नाशिक जिल्ह्यातील शंभर गावांना भगवान गौतम बुद्ध यांच्या १०० मूर्तींचा प्रदान सोहळा मंगळवारी (दि. २) झाला. यानिमित्त नाशिक शहरातून सायंकाळी शंभर रथांची मिरवणूक काढण्यात आली. यात जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील ५०० श्रामणेरांसह हजारो नागरिक सहभागी झाले होते. तसेच यानिमित्त रात्री गोल्फ क्लब येथे महाबौद्ध धम्म परिषद, प्रबोधनपर सांस्कृतिक कार्यक्रम झाला.

ग्रुपचे संस्थापक मोहन आढांगळे यांनी सांगितले की सम्राट अशोक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुद्धजयंती तथा बुद्धपौर्णिमा यानिमित्त २३ एप्रिल ते २ मे दरम्यान जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये श्रामणेर शिबिर घेण्यात आले. या शिबिरात १०० गावांतील प्रत्येकी ५ उपासक हे श्रामणेर झाले असून, सुमारे ५०० श्रामणेरांचे प्रथमच अशा प्रकारे प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. या दरम्यान जिल्ह्यात विविध तालुक्यांमधील १०० गावांना भगवान बुद्ध यांच्या १०० मूर्ती प्रदान करण्यात आल्या. यात नाशिक, मालेगाव, चांदवड, येवला, सिन्नर, नांदगाव, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सिन्नर, सटाणा, कळवण, निफाड, देवळा आदी तालुक्यांचा समावेश आहे.

मिरवणुकीत भदंत ज्ञानज्योती महाथेरो, भदंत बोधीपाल, भदंत धम्मरत्न, भदंत सुगत, भदंत आर्यनाग, भदंत शीलरत्न आदींसह पंचशील ध्वजाचे प्रतीक असलेल्या छत्री हाती घेऊन शेकडो श्रामणेर आणि पांढरे वस्त्र परिधान केलेले हजारो स्त्री-पुरुष, समाजबांधव सहभागी झाले होते. गोल्फ क्लब येथे मिरवणुकीचे रूपांतर श्रामणेर शिबिर तथा प्रबोधन सभेत झाले. यावेळी महाबौद्ध धम्म परिषद आयोजित केली होती. याप्रसंगी प्रदीप पोळ, सचिन वाघ, राहुल बच्छाव, डी. एम. वाकळे, के. के. बच्छाव, वाय. डी. लोखंडे, संजय भरीत, आर. आर. जगताप, पी. डी. खरे, बाळासाहेब सिरसाट, आर. आर. जगताप, अरुण काशीद, नितीन मोरे, बबन काळे, आर. एस. भामरे, गुणवंत वाघ, संदेश पगारे, खुशाल जाधव, अशोक गांगुर्डे, सोमनाथ शार्दुल, शिवाजी काळे, अजिंक्य जाधव आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ठिकठिकाणी मिरवणुकीचे स्वागत

सदर १०० मूर्ती या प्रत्येकी साडेपाच फूट उंच असून, फायबर मेटलपासून एकाच साच्यात तयार करण्यात आलेल्या आहेत. या बुद्धमूर्ती प्रदान सोहळ्यानिमित्त १०० बुद्धमूर्तींची रंगीबेरंगी फुलांनी व निळ्या झेंड्यांनी सजवलेल्या छोटा हत्ती वाहन म्हणजेच १०० रथांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी ५ वाजता तपोवनातून भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषात या मिरवणुकीस प्रारंभ झाला. त्यानंतर ही मिरवणूक जुना आडगाव नाका, द्वारका, मुंबई नाका, गडकरी चौक, त्र्यंबक नाका, सीबीएसमार्गे गोल्फ क्लब येथे आली. दरम्यान, ठिकठिकाणी मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. तसेच अनेक भीमगीते आणि बौद्ध गीते यांनी परिसर व अनेक चौक दणाणून गेले होते.

हेही वाचा : 

 

The post Nashik : बुद्ध मूर्तींची १०० रथांमधून मिरवणूक appeared first on पुढारी.