Site icon

Nashik : बोलठाणच्या विकासात पठाण दाम्पत्याचे योगदान

नांदगाव (जि. नाशिक) : सचिन बैरागी 

नांदगावच्या पूर्व भागात घाटमाथ्यावर जिल्हा हद्दीच्या शेवटच्या टोकावर बोलठाण गाव असून, हे गाव कांदा मार्केटमुळे अधिकच नावारूपास आले आहे.

बोलठाण गावाचा विकास ग्रामपालिकेच्या माध्यमातून वेगाने होत आहे. या विकासामध्ये आमदार सुहास कांदे यांच्या माध्यमातून मा. सरपंच रफिक पठाण आणि त्यांच्या पत्नी विद्यमान उपसरपंच अंजुम पठाण या दाम्पत्यानेदेखील आपला खारीचा वाटा उचलला आहे. रफिक पठाण यांनी २००५ ते २०१० या कालावधीत सरपंच म्हणून कामकाज बघत बोलठाण गावचा कारभार पाहिला, तर पत्नी अंजुम पठाण या विद्यमान उपसरपंच म्हणून कारभार पाहात आहेत. पठाण यांची राजकीय सुरुवात शिवसेनेतून झाली. शिवसेनेचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या पत्नी उपसरपंच पठाण आणि रफिक पठाण आ. कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली आपला राजकीय आणि विकासाचा गाडा पुढे घेऊन जात आहेत. सात ते आठ हजार लोकसंख्या असलेल्या बोलठाण गावात व्यापारी वर्गदेखील मोठा आहे. रफिक पठाण हे सरपंच असताना व्यापाराला अजून गती मिळावी आणि ग्रामपालिकेस उत्पन्न वाढावे हे लक्षात घेत, त्यांनी गावात व्यापारी संकुल उभारण्याचा निश्चय करत ते प्रत्यक्षात आणले.

या व्यापारी गाळ्यांच्या माध्यमातून युवकांना रोजगाराची निर्मिती होऊन गावाच्या विकासाला चालना मिळाली आहे. तसेच पठाण यांच्या कारकिर्दीत गावातील भूमिगत गटारे, गल्लीतील रस्ते काँक्रिटीकरण, घनकचरा व्यवस्थापन या सारख्या विकासाला प्राधान्य देत, रोजगार हमीच्या माध्यमातून शिवार रस्ते, नागरिकांना वैयक्तिक लाभ मिळवून देत, इंदिरा आवास, रमाई माता, शबरीमाता योजना प्रभावीपणे राबवून या माध्यमातून गोरगरिबांना घरकुले मिळवून दिली. तसेच गावात विविध योजनांच्या माध्यमातून गावाच्या विकासाला गती दिली.

गरिबांच्या पाठीशी उभे राहणारे रफिक पठाण
राजकारणाबरोबरच समाजकारणातही पठाण तितकेच सक्रिय असतात. सरपंच असताना त्यांनी जनतेची सेवा केलीच परंतु त्यानंतरही ते जनतेच्या कामासाठी नेहमीच तत्पर असतात. गावातील गोरगरिबांचे छोटे-मोठे शासकीय कामासह वैयक्तिक लाभ मिळवून देण्यासाठी रफिक पठाण नेहमीच पुढाकार घेताना दिसतात.

निराधारांना शासनाच्या पेंशन योजना असो अथवा आरोग्य प्रश्न असो, पठाण हे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात नेहमीच पुढाकार घेताना दिसून येतात. येत्या काळातदेखील पठाण हे बोलठाण गावाच्या विकासात योगदान देत गावाचा विकास आलेख उंचावत नेतील, यात शंका नाही.

हेही वाचा : 

The post Nashik : बोलठाणच्या विकासात पठाण दाम्पत्याचे योगदान appeared first on पुढारी.

Exit mobile version