Nashik : मुंबई आग्रा महामार्गावर भीषण अपघात; 1 जागीच ठार, 1 गंभीर

मुंबई-आग्रा महामार्ग भीषण अपघात

नाशिक (इगतपुरी) पुढारी वृत्तसेवा

मुंबई आग्रा महामार्गावरील इगतपुरी नांदगावसदो फाट्यावर आज शनिवार (दि.27) पहाटेच्या सुमारास एका आयशरने कंटेनरला मागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत १ जण जागीच ठार झाला तर १ जण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात आयशर मधील चालक व क्लीनर हे दोघेही अडकले होते. त्यांना दोन तासांच्या अथक प्रयत्नांनी बाहेर काढण्यात आले. मात्र, त्यातील चालक जागीच ठार झाला होता तर गंभीर जखमी असलेल्या क्लीनरला पुढील उपचारासाठी टोलनाक्याच्या रुग्णवाहिकेने इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अधिक माहिती अशी की, एम. एच २०, ए. एल. ३९७७ या क्रमांकाच्या आयशर वाहनाने एच. आर. ४६, इ. १७१६ या कंटेनरला मागून धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातात चालक संजीव कुमार, वय २२ वर्ष, रा. फिरोजाबाद, उत्तरप्रदेश हा जागीच ठार झाला आहे. तर क्लीनर गंभीर जखमी असून त्याच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. महामार्गावरील या परिसरात खड्डयांचे साम्राज्य पसरले असल्यानेच अपघात घडल्याचे बोलले जात आहे.

प्रसंगी घोटी महामार्ग पोलीस केंद्रचे पोलीस कर्मचारी हरिश्चंद्र गुजरे, जितू पाटोळे, निंबेकर, अनिकेत जाधव, सागर कापसे, इगतपुरीचे पोलीस निरीक्षक वसंत पथवे, पोलीस कर्मचारी विजय रुद्रे, ए. एस. बोराडे, देवा वाघ यांच्यासह आपत्ती व्यवस्थापन टीमचे सदस्य, रूट पेट्रोलिंग टीम यांनी अपघातस्थळी मदतकार्य केले. यावेळी काही काळासाठी वाहतुक खोळंबली होती मात्र महामार्ग सुरक्षा पोलीसांनी मदतकार्य करत वाहतुक सुरळीत केली.

हेही वाचा :

The post Nashik : मुंबई आग्रा महामार्गावर भीषण अपघात; 1 जागीच ठार, 1 गंभीर appeared first on पुढारी.