Nashik : मुख्यमंत्र्यांची पाठ फिरताच अवकाळीचे पुन्हा तांडव

सटाणा (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पाठ फिरताच तालुक्यात सोमवारी (दि. १०) सायंकाळी पुन्हा एकदा अवकाळी पाऊस आणि गारपिटीने हजेरी लावून शेतकरी वर्गाच्या तोंडचे पाणी पळवले. आरम खोऱ्यातल्या पश्चिम पट्ट्यातील जोरण, कपालेश्वर, डांगसौंदाणे, किकवारी, तळवाडे, विंचुरे आदी गावांमध्ये सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांना अश्रूच्या धारा लागल्या आहेत.

तालुक्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि गारपिटीचे थैमान सुरू आहे. मोसम, करंजाडी खोऱ्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दादा भुसे सोमवारी (दि. १०) बागलाण दौऱ्यावर होते. मुख्यमंत्र्यांनी 4.45 ला तालुक्यातून प्रयाण केले आणि थोड्याच वेळात तालुक्याच्या आरम खोऱ्यातल्या पश्चिम पट्ट्यातील जोरण, कपालेश्वर, डांगसौंदाणे, किकवारी, तळवाडे, विंचुरे आदी गावांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीने जोरदार हजेरी लावली. दीड-दोन तासांनंतर या पावसाने सटाणा शहरापर्यंतचा परिसर कवेत घेतला. साहजिकच अवकाळी पाऊस आणि गारपीट हे तालुकावासीयांचा पिच्छा सोडण्यास तयार नसल्याने तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. या अस्मानी संकटामुळे कांदा, गहू, मिरची, द्राक्ष, डाळिंब, टरबूज, पपई तसेच भाजीपाला पिकांची अतोनात हानी झाली आहे.

हेही वाचा : 

The post Nashik : मुख्यमंत्र्यांची पाठ फिरताच अवकाळीचे पुन्हा तांडव appeared first on पुढारी.