Nashik : मैत्रिणीची पाच लाखांची फसवणूक ; मित्राला बेड्या

अटक

सिडको/नाशिक : पुढारी वृत्तसेव
एका खासगी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या मुलीशी मैत्री करून तिचा विश्वास संपादन करीत तिच्याकडून सोन्याचे दागिने व रोकड असा सुमारे पाच लाख रुपयांचा ऐवज घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी संशयित मित्रास अंबड पोलिसांनी अटक केली आहे.
आकाश संजय शिलावट (22, रा. नाशिकरोड) असे संशयिताचे नाव आहे.

याबाबत अंबड पोलिसांनी सांगितले की, आकाशने महाविद्यालयात एका सतरावर्षीय अल्पवयीन मुलीशी मैत्री केली. आकाशने तिचा विश्वास संपादन करून अडचण असल्याचे कारण सांगितले. त्यामुळे तिने त्याला मदतीच्या उद्देशाने घरातील सुमारे दोन लाख रुपयांची रोकड व सोन्याच्या अंगठ्या, चेन, मणी, मंगळसूत्र, कानातील वेल, सोन्याचे पान, पोत असा सुमारे पाच लाख रुपयांचा मुदेमाल संशयित आकाशच्या स्वाधीन केला. यानंतर संशयिताने हे सोन्याचे दागिने एका फायनान्स कंपनीत गहाण ठेवले व त्या बदल्यात तीन ते चार लाख रुपये घेतले. ही सर्व रोकड घेऊन त्याने पोबारा केला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबंधित मुलीने याबाबत अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी संशयित आकाश शिलावट यास अटक केली. त्याने सदरची रक्कम खर्च केल्याचे सांगितले असून, यासंदर्भात वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या मादर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक वसंत खतेले त्याचा तपास करीत आहेत.

दरम्यान, या फायनान्स कंपनीने सोन्याच्या बदल्यात रोकड देताना संशयित आकाश शिलावट याच्याकडून कोणत्याही प्रकारची कागदपत्रे अथवा सोन्याची बिले घेतली नसल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे खासगी बँक संस्थेच्या अधिकार्‍यांनाही या संदर्भात नोटीस बजावल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा :

The post Nashik : मैत्रिणीची पाच लाखांची फसवणूक ; मित्राला बेड्या appeared first on पुढारी.