Nashik : ‘या’ 17 प्रश्नांची उत्तरे द्या आणि नोंदवा नाशिकविषयी तुमचं मत, 23 डिसेंबरपर्यंतच संधी

नाशिक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क 

केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी कामकाज मंत्रालयातर्फे आयोजित ‘इज ऑफ लिव्हिंग इंडेक्स’ सर्वेक्षणाचा तिसरा टप्पा सुरु झाला आहे. या सर्वेक्षणात सहभागी होत नागरिकांनी आपल्या शहराविषयी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. याच्या तिसर्‍या पर्वास 9 नोव्हेंबरपासून सुरुवात झाली असून 23 डिसेंबरपर्यंत नाशिककरांनी या सर्वेक्षणात आपले मत मांडावे असे आवाहन स्मार्टसिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

नाशिकमध्ये देखील हे सर्वेक्षण सुरु आहे. सर्वेक्षणाबाबत जागृती करण्यासाठी स्मार्ट सिटीकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून त्र्यंबक रोडवरील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानाच्या (गोल्फ क्लब) सायकल ट्रॅकच्या भिंतींवर विविध संकल्पना घेऊन भित्तिचित्रे साकारण्यात आली आहेत. या भित्तिचित्रांतून नाशिकची ओळख करुन देण्याचा प्रयत्न आहे. ज्यात नाशिकची मिसळ, नाशिकची वाइन कॅपिटल म्हणून असलेली ओळख, नाशिकची आयटी हबकडे सुरू असलेली वाटचाल, गोदावरी नदी आणि घाट असे नाशिकचे सौंदर्य या भित्तिचित्रांतून भिंतीवर रेखाटण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी रेखाटल्याने आकर्षक भित्तिचित्रांमधून नाशिकच्या धार्मिक, ऐतिहासिक ओळख आणि संस्कृतीचे दर्शन घडत आहे. ‘इज ऑफ लिव्हिंग’ सर्वेक्षणानिमित्त स्मार्ट सिटी कंपनीतर्फे शहरात विविध उपक्रम सुरू असून, हादेखील त्याचाच एक भाग आहे.

गत दोन वर्षांपासून भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी कामकाज मंत्रालयाद्वारे इज ऑफ लिव्हिंग इंडेक्स सर्वेक्षण केले जात आहे. या राहणीमान सुलभता निर्देशांक सर्वेक्षणात नाशिकरांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन भित्तिचित्रांतून करण्यात आले आहे. के . के . वाघ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ही भित्तिचित्रे साकारली आहेत. नाशिककरांनी 23 डिसेंबरपर्यंत eol2022.org या संकेतस्थळावर जावून सर्वेक्षणात आपले मत मांडावे असे आवाहन स्मार्टसिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांनी केले आहे.

त्र्यंबक रोडवरील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानाच्या (गोल्फ क्लब) सायकल ट्रॅकच्या भिंतींवर विद्यार्थ्यांनी रेखाटलेली भित्तिचित्रे…

नेमकं काय आहे हे सर्वेक्षण? जाणून घ्या…

नाशिक शहराला आपले गुणांकन सुधारायचे असेल तर जास्तीत जास्त लोकांनी या सर्वेक्षणात सहभाग घेणे गरजेचे आहे. याच्या तिसर्‍या पर्वास 9 नोव्हेंबरपासून सुरुवात झाली आहे. भारतामधील सर्व प्रमुख शहरांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आणि शासनाचे अन्य प्रमुख विभाग पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत असतात. या सर्व सेवासुविधा आणि शहरातील नोकरी, शिक्षण, आरोग्य, वाहतूक, शहरातील हवामान या प्रमुख बाबींवर त्या-त्या शहरातील राहणीमानाचा दर्जा अवलंबून असतो. या सर्व सेवासुविधांचा आढावा त्यामध्ये सुधार करण्यासाठी शासन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणि सर्व इतर शासनाच्या विभागांकडून अर्बन आउटकम फ्रेमवर्कच्या माध्यमातून प्रश्नावलीच्या स्वरूपात माहिती गोळा करते. यावर्षी 15 ऑक्टोबरपर्यंत ही सर्व माहिती केंद्र शासनाकडे सादर करण्यात आलेली आहे. याच प्रक्रियेचा प्रमुख भाग असलेल्या नागरिकांची मते जाणून घेण्याचा टप्पा म्हणजेच सिटिझन पर्सेप्शन सर्व्हेच्या माध्यमातून म्हणजेच इज ऑफ लिव्हिंग इंडेक्स सर्वेक्षणास 9 नोव्हेंबरला सुरुवात झाली आहे. नागरिकांची मते आणि स्मार्ट सिटी कार्यालय यांनी नोडल एजन्सी म्हणून सर्व विभागांची दिलेली माहिती यांच्या एकत्रित मूल्यांकनानुसार शहराचा इज ऑफ लिव्हिंग इंडेक्स ठरणार आहे.

या सर्वेक्षणामध्ये भाग घेण्यासाठी https://eo12022.org/citizenfeedback या वेबसाइटला भेट देणे आवश्यक आहे. त्यामध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत.

अशी आहे प्रश्नावली….

1) तुम्ही राहत असलेले घर भाडयाने घेतले आहे की स्वतः चे आहे?

2)तुमच्या घरातील वीजपुरवठा खंडित होण्याबाबत आपला काय अभिप्राय आहे?

3)पाणीपुरवठ्याबाबत आपण किती समाधानी आहात?

4) पाणीपुरवठ्याच्या गुणवत्तेबाबत आपला अभिप्राय नोंदवा

5)शहरातील आरोग्य सेवा किती परवडणाच्या आहेत ?

6)आपल्या शहरात आरोग्य सेवा किती प्रवेशयोग्य आहेत ?

7) आपल्या शहरातील आरोग्यसेवांच्या दर्जाबद्दल आपला काय अभिप्राय आहे?

8)शहरात शिक्षणाच्या सुविधा कितपत परवडणा-या आहेत?

9)आपल्या शहरात शिक्षणाच्या सुविधा किती प्रवेश योग्य आहेत?

10)शैक्षणिक सुविधांच्या दर्जाबद्दल आपला अभिप्राय काय आहे?

11)शहरात रोजगाराच्या संधी शोधणे किती सोपे आहे?

12)शहरातील हवा प्रदूषणाची पातळी किती आहे?

13)आपल्या शहरातील स्वच्छतेबाबत अभिप्राय नोंदवा

14)शहरात पुरेशा मनोरंजनाच्या सुविधा आहेत का?

15)शहरात प्रवास करणे किती सोपे आहे?

16)तुम्हाला तुमच्या शहरात किती सुरक्षित वाटते ?

17)आपल्या शहरात राहण्यासाठी होणाऱ्या खर्चाबाबत आपले मत द्या

The post Nashik : 'या' 17 प्रश्नांची उत्तरे द्या आणि नोंदवा नाशिकविषयी तुमचं मत, 23 डिसेंबरपर्यंतच संधी appeared first on पुढारी.