Site icon

Nashik : राजस्थानातून खरेदी केलेले गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस जप्त; तिघे ताब्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मिठाई दुकानातील कारागिराने राजस्थान येथून गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस आणून ते एकास दिले होते. हा प्रकार गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकास समजल्यानंतर पोलिसांनी तपास करून तिघांना ताब्यात घेतले आहे. प्राॅपर्टी एजंटने मागणी केल्यानंतर कामगाराने राजस्थानातून गावठी पिस्तूल आणून ते तिसऱ्याकडे ठेवण्यासाठी दिल्याचे तपासात समाेर आले आहे.

मुकेश फुआरामजी सोळंकी (२०, रा. भाभानगर) सचिन राजेंद्र अंधारे (३७, प्राॅपर्टी एजंट, रा. शिक्षक कॉलनी, धात्रक फाटा) व मंगेश अरुण कोथमिरे (३४, रा. अमृतधाम, पंचवटी) अशी अटक केलेल्या तिघा संशयितांची नावे आहेत. पोलिस आयुक्त अंकुश शिंदे व गुन्हे उपआयुक्त प्रशांत बच्छाव यांच्या आदेशानुसार पथक गुन्हेगारांचा शाेध घेत हाेते. गुन्हे शाखा युनिट एकचे उपनिरीक्षक विष्णू उगले, अंमलदार रवींद्र बागूल यांना मिळालेल्या माहितीनुसार, मिठाई दुकानातील कामगार मुकेश सोळंकीने मागील महिन्यात राजस्थानमधून देशी पिस्तूल आणल्याची माहिती मिळाली. युनिट एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून मुकेशला भाभानगर येथून पकडले. मुकेशकडे विचारपूस केली असता त्याने प्राॅपर्टी एजंट सचिन अंधारे यांच्या सांगण्यावरून जोधपूर येथून गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतूस आणल्याची कबुली दिली. त्याने पिस्तूल त्याचा मित्र मंगेश कोथमिरे याच्याकडे ठेवण्यास दिल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी मंगेशकडून पिस्तूल जप्त केले असून, तिघांना पकडले आहे.

पोलिसांनी या कारवाईत ३५ हजारांचे पिस्तूल व ५०० रुपयांचे जिवंत काडतूस जप्त केले आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रवीण वाघमारे, प्रदीप म्हसदे, सुरेश माळोदे, शरद सोनवणे, विशाल देवरे, चालक हवालदार नाझीमखान पठाण यांनी कामगिरी केली.

हेह वाचा :

 

The post Nashik : राजस्थानातून खरेदी केलेले गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस जप्त; तिघे ताब्यात appeared first on पुढारी.

Exit mobile version