Site icon

Nashik : लासलगावी यंदा उन्हाळ कांद्याची विक्रमी आवक

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारावर सोमवारी (दि.3) 2, 035 वाहनांमधून सर्वाधिक 37, 550 क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली. बाजारभाव कमीत कमी 700 रूपये, जास्तीत जास्त 2, 651 रूपये तर सर्वसाधारण 1,460 रूपये प्रतिक्विंटल होते.

बाजार समितीचे श्री छत्रपती शिवाजी महाराज स्वतंत्र कांदा बाजार आवार सकाळपासून वाहनांच्या गर्दीमुळे फुलून गेले होते. दिवसभरात येथील बाजार आवारावर 460 ट्रॅक्टर व 1,575 पिकअपमधून 37,550 क्विंटल कांदा विक्रीस आला होता. त्यामुळे चालू वर्षात कांद्याची विक्रमी आवक झाली. रविवारी साप्ताहिक सुटीमुळे कांदा लिलाव बंद असल्याने येथील बाजार समितीत कांदा विक्रीसाठी शेतकरी बांधवांनी एकच गर्दी केली होती. बाजार आवारावर आलेल्या सर्व आवकेचे लिलाव पूर्ण करण्याच्या दृष्टीने सर्व अडते, व्यापारी, मदतनीस, कामगार व बाजार समितीच्या सेवकांनी जलदगतीने लिलाव प्रक्रिया पूर्ण केल्याची माहिती बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी दिली.            सध्या खरीप पिकाच्या लागवडीचा हंगाम मोठ्या प्रमाणात सुरू झालेला असल्याने शेतकरी बांधवांना मशागतीचे कामे, बी-बियाणे, रासायनिक खते, औषधे इ. कामांसाठी पैशांची निकड भासत आहे. त्यामुळे येथील बाजार समितीत उन्हाळ कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक होत असून, आलेल्या सर्व आवकेचे त्याच दिवशी लिलाव पूर्ण करून शेतकरी बांधवांना रोख चुकवती केली जात आहे. सोमवारी (दि. 3) बाजार समितीच्या मुख्य व उपबाजार आवार मिळून सुमारे 10 कोटी रुपयांची उलाढाल झाली. बाजार आवारावर विक्रीस आलेल्या शेतीमालाचे वेळेत लिलाव व वजनमाप होत असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. वेळेत लिलाव व वजनमाप पूर्ण केल्याबद्दल सभापती क्षीरसागर, उपसभापती गणेश डोमाडे, सचिव नरेंद्र वाढवणे यांच्यासह सदस्य मंडळाने सर्व अडते, व्यापारी, हमाल, मापारी, कांदा भरणार हमाल, मदतनीस व बाजार समिती सेवकांचे अभिनंदन करून आभार मानले.

निफाड व विंचूरलाही विक्रमी आवक

लासलगाव पाठोपाठ बाजार समितीच्या निफाड उपबाजार आवारावरही कांद्याची सर्वाधिक आवक झाली. निफाड उपबाजार आवारावर 686 वाहनांमधून 6,600 क्विंटल कांदा विक्रीस आला होता. बाजारभाव कमीत कमी रु. 500/-, जास्तीत जास्त रु. 1,700/- व सर्वसाधारण रु. 1,350/- प्रतिक्विंटल होते. तसेच विंचूर उपबाजार आवारावरही कांद्याची सर्वाधिक आवक झाली. येथे 1561 वाहनांमधून 28, 500 क्विंटल कांदा विक्रीस आला होता. बाजारभाव कमीत कमी रु. 600/-, जास्तीत जास्त रु. 1,901/- व सर्वसाधारण रु. 1,401/- प्रतिक्विंटल होते. आलेल्या सर्व आवकेचे सायंकाळपर्यंत लिलाव पूर्ण केल्याने तेथील व्यापारीवर्गासह इतर सर्व मार्केट घटकांचे तसेच मालविक्रीस आलेल्या शेतकरी बांधवांचे बाजार समिती प्रशासनाने आभार मानले.

हेही वाचा : 

The post Nashik : लासलगावी यंदा उन्हाळ कांद्याची विक्रमी आवक appeared first on पुढारी.

Exit mobile version