Nashik : वाहतुकीच्या स्वयंशिस्तीसाठी आता नाशिककरांचेच प्लटून्स

वाहतूक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

वाहतूक नियम पाळल्यास बहुतांश अपघात व अपघाती मृत्यू कमी होण्याचे प्रमाण वाढते. त्यासाठी बेशिस्त चालकांवर दंडात्मक कारवाईसह वेगवेगळ्या क्लृप्त्या लढविल्यानंतर आता शहर पोलिसांनी नाशिककरांच्याच मदतीने शिस्त लावण्याचा प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार वाहतुकीचे नियम पाळणारे सायकल, दुचाकी व चारचाकी वाहनांचे ‘प्लटून्स’ तयार करून त्यांचे ठराविक रस्त्यांवरून संचलन होणार आहे. या प्लटून्ससाठी आवश्यकतेनुसार ग्रीन कॉरिडॉरही तयार केला जाईल. जेणेकरून नाशिककरांना वाहतूक नियमांबाबत स्वयंशिस्त लावता येईल, असा प्रयत्न शहर पोलिस करीत आहेत.

शहराची प्रगती तेथील वाहतुकीवरही अवलंबून असते. वाहतूक खोळंबा होत असल्यास प्रगतीसही अडसर येतो. त्याचप्रमाणे बेशिस्त चालकांमुळे अपघात व अपघाती मृत्यूंचे प्रमाण वाढते, ते तसेच राहिल्यास त्याचा कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक बाबींवरही परिणामही होतो. त्यामुळे पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी वाहतूक सुरक्षिततेस प्राधान्य दिले असून, राष्ट्रीय महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी लेन कटिंग न करण्याचे आवाहन अवजड वाहनचालकांना केले. त्यासाठी त्यांनी महामार्गांवर गस्त सुरू केली आहे. त्याचप्रमाणे वाहनतळ, वाहतूक बेट अरुंद करण्यासह नव्याने २२ सिग्नल कार्यान्वित करण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. तसेच दुचाकीस्वारांमध्ये हेल्मेटचा वापर वाढावा, यासाठी हेल्मेट सक्ती मोहीमही सुरू केली आहे. मात्र दंडात्मक कारवाईपेक्षा स्वयंशिस्त असल्यास त्याचा सकारात्मक परिणाम जलद व मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. त्यामुळे नाशिककरांच्याच मदतीने स्वयंशिस्त लावण्याचा प्रयत्न पोलिस करणार आहेत. त्याचा एक भाग म्हणून शहरातील सायकलस्वार, दुचाकीस्वार व कारचालकांच्या तुकड्या तयार केल्या जातील. या तीनही तुकड्या वाहतूक नियमांचे पालन करीत शहरातील ठराविक मार्गांवरून संचलन करतील. त्यांचे शूटिंग ड्रोनद्वारे करण्यात येईल व नाशिककरांना वाहतूक नियम पाळण्याचे आवाहन केले जाईल. यासाठी वाहतूक विभागाचे नियोजन सुरू असून, हा उपक्रम लवकरच राबविण्यात येणार आहे.

असे राहील संचलन

शहरातील महत्त्वाच्या मार्गांवरून सायकल, दुचाकी आणि कारचे तीन ‘प्लटून्स’ संचलन होईल. त्यात तीनही प्लटून्स वाहतुकीचे सर्व नियम पाळतील. यासाठी त्यांना ५ ते १० किमी अंतराचा ‘ग्रीन कॉरिडॉर’ करून एखाद्या ‘कॅन्व्हॉय’प्रमाणे शिस्तीत रस्त्याच्या एकाच बाजूने हे पथसंचलन होईल. त्यानंतर दुतर्फा संचलन होईल. संचलनाचे ड्रोनद्वारे शूटिंग होणार आहे. त्याचप्रमाणे पुढील टप्प्यात शहरातील चौकांसह, सिग्नल व इतर रस्त्यांवरूनही नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यासाठी प्लटून्सचा वापर होईल.

शिस्तबद्धरीत्या वाहने चालवल्यास अपघात होत नाहीत. वेळेची बचत होते व वाहतूक कोंडी होत नाही. वाहने चालवताना स्पर्धेऐवजी सुरक्षा महत्त्वाची आहे. त्यासाठी वाहनचालकांनी स्वयंशिस्त पाळणे गरजेचे आहे. स्वयंशिस्त राहिल्यास त्याचा फायदा कसा होतो, हे दाखवण्यासाठी सायकल, दुचाकी व चारचाकी वाहनांचे प्लटून्स तयार करून त्यांचे संचलन होईल. त्यानंतर नागरिकांनाही स्वयंशिस्तीचे आवाहन केले जाईल.

– जयंत नाईकनवरे, पोलिस आयुक्त

हेही वाचा :

The post Nashik : वाहतुकीच्या स्वयंशिस्तीसाठी आता नाशिककरांचेच प्लटून्स appeared first on पुढारी.