Nashik : वाहतुक नियमांच्या प्रबोधनासाठी ‘ऐका ना नाशिककर’ मोहीम

वाहतूक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरातील वाहतुकीस शिस्त लागावी व वाहतूक नियम पालनाबाबत प्रबोधन करण्यासाठी नाशिक फर्स्ट आणि लॉर्ड इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात ‘ऐका ना नाशिककर’ ही मोहीम राबविली जाणार आहे. या मोहिमेंतर्गत शहरात फलकांवरून वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जाणार आहे. येत्या 21 ते 31 जुलै दरम्यान ही मोहीम शहरात राबविली जाणार असल्याचे नाशिक फर्स्टचे अध्यक्ष अभय कुलकर्णी, व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र बापट, संचालक सुरेश पटेल व गौरव धारकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

नाशिकच्या वाहतुकीस शिस्त लावण्यासाठी पोलिस आणि प्रादेशिक परिवहन विभाग सतत प्रयत्नशील असतो. त्यांच्या जोडीला नाशिककर म्हणून आपलेही कर्तव्यही असल्याने ‘ऐका ना नाशिककर’ ही मोहीम राबविली जाणार आहे. त्यात एक नाशिककर दुसर्‍या नाशिककरास वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करणार असल्याचे पदाधिकार्‍यांनी सांगितले. या मोहिमेंतर्गत शहरातील 50 पेट्रोल पंपांवर वाहतूक जनजागृतीचे फलक लावण्यात येतील. त्याचप्रमाणे शहरातील 1500 रिक्षा, सिटी लिंकच्या बसेसवरही पोस्टर लावले जातील. शासकीय कार्यालये, सार्वजनिक ठिकाणी पोस्टर लावून वाहतूक नियमांबाबत जनजागृती केली जाणार आहे. त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी या वाहनांची रॅली काढण्यात येणार असल्याचे पदाधिकार्‍यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

दहा दिवस जनजागृतीवर भर
गुरुवारी (दि. 21) ट्रॅफिक एज्युकेशन पार्क येथे लॉर्ड इंडिया कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अनुप देशमुख, पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, मनपा आयुक्त रमेश पवार, प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे आदी मान्यवरांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर 10 दिवस वाहतूक नियमांबाबत जनजागृती केली जाणार असून, त्यानंतरही जनजागृतीवर भर राहणार असल्याचे पदाधिकार्‍यांनी सांगितले.

हेही वाचा :

The post Nashik : वाहतुक नियमांच्या प्रबोधनासाठी ‘ऐका ना नाशिककर’ मोहीम appeared first on पुढारी.