Nashik : व्यंग-वास्तव एकत्र येते तेव्हा देश गंभीर स्थितीत – वात्रटिकाकार रामदास फुटाणे

रामदास फुटाणे,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मराठीचा बळी देऊन इंग्रजी माहितीचे रोबो घराघरात तयार होतील. आईची मम्मी होते, तेव्हा ग्रॅज्युएट झाल्यासारखे वाटते. आता भावंडांना दादा, ताई न म्हणता कझीन म्हटले जाते. इंग्रजी गरजेची असली, तरी मातृभाषा जगण्याचे बळ देते, असे विचार प्रख्यात वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी व्यक्त केले. वात्रटिका, व्यंगचित्र सादर करताना व्यंग आणि वास्तव एकत्र येते, तेव्हा देश गंभीर स्थितीत असतो, अशा शब्दांत त्यांनी सध्याच्या स्थितीवर मर्मिकपणे बोट ठेवले.

सार्वजनिक वाचनालयाच्या ग्रंथालय सप्ताह कार्यक्रमात ते बोलत होते. संवादक म्हणून व्यासपीठावर कवी प्रकाश होळकर, कवी अनिल दीक्षित उपस्थित होते. फुटाणे म्हणाले, लेखनात, साहित्यात प्रवृत्ती जगात सर्वत्र सारख्या आहेत. वात्रटिका, व्यंगचित्र सादर करताना व्यंग आणि वास्तव एकत्र येते, तेव्हा देश गंभीर स्थितीत असतो. देशात ८० टक्के भारत आहे, तर २० टक्के देश इंडिया आहे. २० टक्के इंडिया वेगाने प्रगती करतोय, पण ८० टक्के भारताची फरपट सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व जातींना आरक्षण दिले, तरी ९० टक्के मुलांना नोकरी मिळणार नाही. त्यामुळे दुसरा पर्याय हवा, असेही मत त्यांनी मांडले. कवी अनिल दीक्षित यांनी राजकारणावर विडंबन सादर केले.

या प्रसंगी उत्कृष्ट स्त्री-पुरुष वाचक, बालवाचक पुरस्कार तसेच बी. लिब., एम. लिब. अभ्यासक्रमात प्रथम येणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर सावाना अध्यक्ष प्रा. दिलीप फडके, प्रा. डॉ. सुनील कुटे, गिरीश नातू, डॉ. धर्माजी बोडके, सुरेश गायधनी, जयप्रकाश जातेगावकर उपस्थित होते. वैद्य विक्रांत जाधव यांनी प्रास्ताविक, उदयकुमार मुंगी यांनी सूत्रसंचालन केले.

हेही वाचा :

The post Nashik : व्यंग-वास्तव एकत्र येते तेव्हा देश गंभीर स्थितीत - वात्रटिकाकार रामदास फुटाणे appeared first on पुढारी.