Nashik : व्हॅलेंटाइन डे’साठी गुलाब उत्पादकांची लगबग

गुलाब उत्पादकांची लगबग,www.pudhari.news

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा

बाराही महिने भरपूर मागणी असल्याने तालुक्यातील शेतकरी फूलशेतीकडे वळला आहे. फुलांचा राजा म्हणजेच गुलाब. गुलाब हे प्रेमाचे प्रतीक आहे. लग्नसमारंभ असो किंवा वाढदिवस, सभा, सणवार, धार्मिक विधी अशा अनेक कार्यक्रमांसाठी गुलाबाची मागणी मोठ्या प्रमाणावर होत असते. व्हॅलेंटाइन डे ला तर गुलाबाला उच्चांकी दर मिळतो. मात्र, या वर्षी मागणी वाढली असताना बाजारभावात अल्पशी वाढ झाली आहे.

तालुक्यातील जानोरी, मोहाडी, खडक सुकेणे, पालखेड, खेडगाव, आबेदिंडोरी, जऊळके दिंडोरी आदी ठिकाणी गुलाबशेती केली जाते. तालुक्यात 72 हेक्टर क्षेत्रावर गुलाबशेती केली जाते, तर 12 हेक्टर क्षेत्रावर पॉलिहाउसमध्ये विविध प्रकारच्या गुलाबाची लागवड करून उत्पादन घेतले जाते.

फुलांसाठी देशांतर्गत उत्तम बाजारपेठ म्हणजे दिल्ली आहे. त्यापाठोपाठ पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, दिल्ली, जयपूर, कोटा, चेन्नई, अहमदाबाद, तसेच भारतातून गुलाबाची फुले सिंगापूर आणि पश्चिम आशियातील सर्व देश, तसेच युरोपातून भारतातील गुलाबाच्या फुलाला चांगली मागणी असते.

टॉप ताजला चांगली मागणी

पॉलिहाउसमधील टॉप ताज गुलाबाच्या फुलाला चांगल्या प्रतीची मागणी आहे. प्री-कूलिंगमध्ये अथवा कोल्ड स्टोअरेजमध्ये ठेवल्यास 10 ते 12 दिवस फूल टिकते. पाकळ्या व पाने लवकर गळत नाही व दिसण्यासही आकर्षक दिसते. त्यामुळे बाजारपेठेत या फुलांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

पॉलिहाउससाठी 50 टक्के अनुदान

महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी पॉलिहाउस उभारण्यासाठी मोफत मार्गदर्शन दिले जाते, शिवाय एकात्मिक विकास फलोत्पादन अभियानांतर्गत 50 टक्के अनुदान दिले जाते, तळेगाव दाभाडे येथे हॉर्टिकल्चर ट्रेनिंग सेंटर शेतकऱ्यांसाठी उभारण्यात आले आहे, त्यात फूल उत्पादक शेतकऱ्यांना 5 दिवसांचे प्रशिक्षण दिले जाते. ट्रेनिंग घेऊन तालुक्यातील शेतकऱ्यांनी निर्यातक्षम फूल उत्पादन घेत आहेत.

बाजारभाव – 20 फुले (एक बंच)

ओपन गुलाब : 15 डिसेंबर ते 15 जानेवारी 30 ते 40 रुपये

16 जानेवारी ते 3 फेब्रुवारी 50 ते 70 रुपये

पॉलिहाउस गुलाब : 15 डिसेंबर ते 15 जानेवारी 50 ते 80 रुपये
16 जानेवारी ते 3 फेब्रुवारी 90 ते 150 रुपये

दिंडोरी तालुक्यात गुलाब शेतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण आहे, इतर पिकांच्या तुलनेत जोखीम कमी असून, बाजारपेठ जवळ उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी फूलशेतीकडे वळल्यास उत्पन्नात वाढ होईल.
– विजय पाटील, तालुका कृषी अधिकारी दिंडोरी

जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात विविध डे व लग्नसमारंभ यामुळे गुलाबाच्या फुलांना मागणी जास्त असते. याही वर्षी मागणी आहे. मात्र, त्या तुलनेत बाजारभावात वाढ कमी झाली आहे. भांडवलात वाढ झाली, मात्र पाहिजे तेवढे बाजारभाव वाढले नाही.
– उमेश घुमरे, फूल उत्पादक,

हेही वाचा :

The post Nashik : व्हॅलेंटाइन डे'साठी गुलाब उत्पादकांची लगबग appeared first on पुढारी.