Nashik : शालेय पोषण आहार : ठेकेदारांच्या किचन शेडची स्पॉट पाहणी

शालेय पोषण आहार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शालेय पोषण आहार पुरवठ्यासाठी पात्र ठेकेदाराची निवड करण्याकरता प्राप्त निविदांच्या कागदपत्रांसह ठेकेदारांच्या किचन शेड तसेच गोदामाची स्पॉट पाहणी सुरू आहे. तसेच येत्या 1 डिसेंबरपासून विद्यार्थ्यांना आहार पुरवठा करण्याच्या दृष्टीने नवीन ठेकेदारांची निवड करण्याबाबतचा अहवाल मनपा शिक्षण विभागाकडून आयुक्तांकडे सादर केला जाणार आहे.

कोरोना महामारीआधी महापालिकेने शासन आदेशानुसार निवड प्रक्रिया राबवून 13 ठेकेदारांची आहार पुरवठा करण्याकरता निवड केली होती. मात्र, संबंधित ठेकेदारांकडून निकृष्ट दर्जाचे अन्न पुरविले जात असल्याचे तसेच नियमांचे पालन होत नसल्याबाबत प्राप्त तक्रारींच्या आधारे मनपा प्रशासनाने तपासणी केली असता त्यात तथ्य आढळून आल्याने 13 ठेकेदारांचे ठेके रद्द करण्यात आले होते. यावर काही ठेकेदारांनी न्यायालयात दावा दाखल केला होता. यानंतर कोरोना महामारीचा प्रादुर्भाव झाल्याने शाळा बंद ठेवण्यात आल्याने आहार पुरवठ्याचे कामही थांबूनच होते. शाळा सुरू झाल्यानंतर पोषण आहार पुरवठ्याचा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आणि त्याच दरम्यान न्यायालयाने निविदा प्रक्रिया राबविण्याचा अधिकार मनपाला असल्याचे सांगत दावा निकाली काढला. निविदा प्रक्रिया राबविण्यापूर्वी मनपाचे माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते तसेच गटनेते विलास शिंदे यांनी आहार पुरवठ्याचे काम पूर्ववत महिला बचतगटांना देण्याची तसेच अटी-शर्ती शिथिल करण्याची मागणी केली होती. त्यानुसार मनपाने अटी शिथिल करत बचतगटांचा मार्ग मोकळा केला. नवीन निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. तत्पूर्वी संबंधित जुन्या ठेकेदारांपैकी काही ठेकेदारांच्या गोदामाची पुणे येथील पथकाकडून तपासणी झाली असता त्या ठिकाणी शासनाचा 14 हजार किलो तांदूळ पडून असल्याची बाब समोर आली होती. अर्थात, हे प्रकरण नोटिसींचे सोपस्कार पूर्ण करून कागदोपत्री संपुष्टात आणले गेले.

आता नव्या निविदा प्रक्रियेनुसार महापालिका, खासगी अनुदानित शाळांमधील एक लाख 18 हजार विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरवठा करण्यात येणार असून, त्यासाठी 25 महिला बचतगटांना प्रत्येक दोन हजार मुलांना पोषण आहार पुरवठ्याचे काम दिले जाणार आहे. त्यासाठी 30 निविदा प्राप्त झाल्या आहेत. पैकी 25 पात्र निविदाधारक निवडण्याची प्रक्रिया सुरू आहे. संबंधित 30 निविदाधारकांच्या किचनशेड तसेच गोदामाची तपासणी केली जात आहे. या तपासणीचा अहवाल आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे सादर केल्यानंतर त्यातून 25 पात्र ठेकेदार निवडण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाच्या प्रशासनाधिकारी सुनीता धनगर यांनी सांगितले.

11 निविदाधारक आधीच पात्र
या आधी 11 निविदाधारक पात्र ठरविण्यात आले आहेत. या पात्र ठेकेदारांना प्रत्येकी चार हजार विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरवठ्याचे काम दिले जाणार आहे. तर दुसरीकडे प्रत्येकी 10 हजार मुलांच्या दोन गटांना आहार पुरवठा करण्याकरता एकही निविदा प्राप्त झाली नाही. यामुळे त्यासाठी फेरनिविदा प्रसिद्ध करणार की विद्यार्थ्यांची संख्या कमी असणारे गट निर्माण करणार याबाबत निर्णय होणे बाकी आहे.

न्यायालयीन दाव्यामुळे अडचण
महापालिका प्रशासन पोषण आहार पुरवठ्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असली तरी जुन्या ठेकेदारांपैकी नाशिकरोड येथील उद्दिष्ट महिला बचतगट आणि शिखर महिला बचतगटाने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यांमुळे अडचणी निर्माण होऊ शकतात. जुन्या ठेकेदारांना तीन वर्षांसाठी आहार पुरवठ्याचे काम देण्यात आले होते. त्यापैकी दोन वर्षे कोरोनाचे गेल्याने या दोन वर्षांचा कालावधी वाढवून मिळावा, अशी मागणी बचतगटांनी दाव्याच्या माध्यमातून न्यायालयाकडे केली आहे. यामुळे मनपाच्या प्रक्रियेला स्थगिती मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

The post Nashik : शालेय पोषण आहार : ठेकेदारांच्या किचन शेडची स्पॉट पाहणी appeared first on पुढारी.