Nashik : शिवजयंतीला परवानगी घेऊनच फलक लावा – पोलिस आयुक्त

नाशिक पोलिस आयुक्त अकुंश शिंदे,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरात विनापरवानगी फलकबाजी करू नये. फलक लावण्यासाठी पोलिसांची पूर्वपरवानगी आवश्यक आहे. त्यासाठी फलकावरील मजकूर, फाेटोचा कच्चा नमुना पोलिसांना दाखवावा लागणार आहे. जेणेकरून फलकांवरून होणारे वाद निर्माण होणार नाहीत. त्यामुळे विनापरवानी कोणीही फलकबाजी करू नये, असे आवाहन पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी केले आहे.

शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर पोलिस मुख्यालयातील भीष्मराज बाम सभागृहात शांतता समितीच्या सदस्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी पोलिस आयुक्त शिंदे बोलत होते. या बैठकीत उपआयुक्त किरणकुमार चव्हाण, पौर्णिमा चौघुले-श्रींगी, चंद्रकांत खांडवी, किरणकुमार चव्हाण, मनपाच्या उपआयुक्त अर्चना तांबे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात आदी अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत सार्वजनिक मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी सण-उत्सव साजरे करताना त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचा पाढा वाचला. परंतु पोलिस आयुक्तांनी पदाधिकाऱ्यांच्या समस्यांचे निराकरण केले. परवानगी घेऊन फलक लावल्यास वाद टाळले जातील. त्याचप्रमाणे मंडळांनी सामाजिक भान राखत एकोप्याचा संदेश देणारी कृती किंवा उपक्रम राबवावा. असे उपक्रम राबवणाऱ्या मंडळास पोलिस, मनपा विभागातर्फे बक्षीस दिले जाईल, असेही शिंदे यांनी सांगितले.

गुन्हेगारांवर कारवाई होणारच

गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू असून, आगामी काही दिवसांत त्यात वाढ होईल. त्याचप्रमाणे नवीन मंडळाची नोंदणी असेल तरच त्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परवानग्यांसाठी पोलिस आयुक्तालयात येणे गरजेचे असून, इतर मंडळांना विभागीय स्तरावरच परवानगी मिळेल, अशी तरतूद करण्याचे आश्वासन पोलिस आयुक्तांनी दिले.

पोलिस उपआयुक्त पौर्णिमा चौगुले यांनी डीजेचा वापर करू नये, सीसीटीव्ही व स्वयंसेवकांची संख्या वाढावावी, असे यावेळी सांगितले. मनपा उपआयुक्त अर्चना तांबे यांनी परवानग्यांसाठी ऑनलाइन, एक खिडकी योजना सुरू असून, मंडळांनी त्यांचा लाभ घ्यावा, परवानग्या देण्यासाठी विभागनिहाय नोडल अधिकारी नेमल्याचेही सांगितले.

मंडळांनी मांडलेल्या समस्या

– मिरवणूक मार्गातील अडथळे, अतिक्रमणे काढावीत

– स्मार्ट सिटीची कामे मिरवणुकीआधी पूर्ण करावीत.

– वाहतूक कोंडीमुळे पर्यायी वाहतूक व्यवस्था करावी

– मद्य व मांस विक्री बंद ठेवावी

– गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करावी

हेही वाचा : 

The post Nashik : शिवजयंतीला परवानगी घेऊनच फलक लावा - पोलिस आयुक्त appeared first on पुढारी.