Nashik : शिवजयंती मिरवणुकांवर राहणार सीसीटीव्हीची नजर

शिवजयंती www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शिवजयंतीनिमित्त शहरातील सार्वजनिक मंडळे सज्ज झाली असून, पोलिसांनीही उत्सव समित्यांच्या बैठकांना सुरुवात केली आहे. जयंतीच्या दिवसासाठी पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन करण्यास सुरुवात केली असून, सीसीटीव्हीचा वापर करण्यावरही पोलिसांचा भर आहे. मिरवणुकीत टवाळखोरांवर बारीक नजर ठेवण्याचे आदेश वरिष्ठ पोलिसांनी दिले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त तरुणाईमध्ये उत्साह संचारला असून सार्वजनिक मंडळांनी देखावे, मिरवणुकीचे नियोजन केले आहे. पोलिस आयुक्तालयाने मिरवणुकीत डीजे न लावण्याचे आवाहन सुरुवातीलाच केल्याने यंदाही ढोल पथकाचे आकर्षण मिरवणुकीत राहणार आहे. त्याचप्रमाणे डीजे नसला तरी देखाव्यांसह मिरवणुकीवर सीसीटीव्हीची नजर महत्त्वाची राहणार असल्याचे पोलिसांनी मंडळ पदाधिकाऱ्यांना सांगितले.

पोलिस ठाणेनिहाय मंडळ पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या जात आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून जयंती साजरी करणे, कोणताही गोंधळ, वाद, टवाळखोरी न करता जयंती उत्साहात साजरी होईल, यासाठी आयोजकांनी दक्ष राहण्याच्या सूचना पोलिसांकडून दिल्या जात आहेत. उपनगर व नाशिकरोड पोलिसांच्या हद्दीत सहायक आयुक्त अंबादास भुसारे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी महापालिका विभागीय अधिकारी जयश्री बैरागी, महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता जितेंद्र महाजन, वाहतूक पोलिस निरीक्षकांचे पथक यांसह शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे अध्यक्ष कृष्णा लवटे, माजी अध्यक्ष किशोर जाचक व इतर आयोजकांसह पदाधिकारी उपस्थित होते. तर भद्रकाली पोलिसांतर्फे लवकरच स्थानिक आयोजकांसह मुख्य मिरवणुकीतल्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टवाळखोरांचा खास बंदोबस्त
टवाळखोरांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांकडून पथके नेमली जाणार आहेत. मिरवणुकीत डीजेला बंदी असून, पारंपरिक वाद्य वाजवण्याचे आवाहन पोलिसांकडून होत आहे. मिरवणुकीदरम्यान देखाव्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही, यासाठी नियोजन केले जात आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून खबरदारी म्हणून दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथकही तैनात राहणार आहे.

हेही वाचा : 

The post Nashik : शिवजयंती मिरवणुकांवर राहणार सीसीटीव्हीची नजर appeared first on पुढारी.