Site icon

Nashik : श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचा नेपाळमध्ये आंतरराष्ट्रीय सत्संग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या वतीने गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांच्या उपस्थितीत ‘श्री अतिरुद्रात्मक रुद्राक्ष लिंगार्चन व श्री ललिता सहस्त्रनाम पठण’ या सेवेचा अंतर्भाव असलेल्या भव्य आंतरराष्ट्रीय सत्संग सोहळ्याचे आयोजन श्री क्षेत्र पशुपतीनाथ, हंसमंडप, गौशाला, काठमांडू (नेपाळ) येथे शनिवारी (दि.१०) जून रोजी करण्यात आल्याची माहिती श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे देश- विदेश अभियान प्रमुख नितीन मोरे यांनी दिली.

या सोहळ्यात नाशिक जिल्ह्यातील एकवीस हजार, तर राज्यातून पंच्याहत्तर हजार सेवेकरी, भाविक उपस्थित राहणार आहेत. अ. भा. श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरचे पीठाधीश गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांच्या सान्निध्यात जगभरातील श्री स्वामी समर्थ सेवेकरी ही अतिविशेष आध्यात्मिक सेवा भगवान पशुपतिनाथ आणि गुहेश्वरी मातेच्या स्थानावर करणार आहेत. अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे गेल्या सत्तर वर्षांपासून सुरू आहे. दरम्यान, नेपाळस्थित नियोजन समितीकडून या आंतरराष्ट्रीय सत्संग सोहळ्याची पूर्वतयारी गेल्या सहा महिन्यांपासून सुरू आहे. नेपाळच्या इतिहासात प्रथमच होऊ घातलेल्या या ऐतिहासिक-आध्यात्मिक कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नेपाळ राष्ट्राचे उपराष्ट्रपती रामसहाय प्रसाद यादव आहेत.

प्रधान सेनापती (सेनाध्यक्ष) प्रभुराम शर्माजी व प्रहरी प्रमुख (पोलिस महासंचालक) वसंत कुँवरजी कार्यक्रमाचे विशेष अतिथी आहेत. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी आठला ‘श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भूपाळी आरती’ने होईल. त्यानंतर ‘अतिरुद्रात्मक रुद्राक्ष लिंगार्चन समारोह व श्री ललिता सहस्त्रनामाचा पाठ’ होईल. त्यानंतर गुरुमाउलींचे – आध्यात्मिक व वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून -वैयक्तिक, सामाजिक, राष्ट्रीय विकास’ यावर विषयावर हितगुज होईल. या ऐतिहासिक-आध्यात्मिक सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन नेपाळच्या वतीने आयोजन समितीचे अध्यक्ष अभिराज आचार्य यांनी केले आहे.

The post Nashik : श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचा नेपाळमध्ये आंतरराष्ट्रीय सत्संग appeared first on पुढारी.

Exit mobile version