Site icon

Nashik : संत निवृत्तिनाथ पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तिनाथांची पालखी घेऊन हजारो वारकरी शुक्रवारी (दि. 2) आषाढवारीसाठी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले. यावेळी ज्यांना वारीसाठी जाता आले नाही अशा पंचक्रोशीतील हजारो ग्रामस्थांनी दिंडोरी सोहळ्याला हजेरी लावत ‘एवढा करा उपकार… सांगा देवा नमस्कार..’ असे म्हणत हात जोडले.

यंदा प्रथमच विश्वस्त मंडळाने मानकरी दिंडीचालकांच्या विचारविनिमयाने एक दिवस अगोदर प्रस्थान केले. दुपारी दोनच्या सुमारास दिंडोरीचे प्रस्थान झाले. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास दोन किमी अंतरावर प्रयागतीर्थ (पेगलवाडी फाटा) येथील महानिर्वाणी आखाडा येथे पोहोचली. पालखी सोहळ्यासाठी उपस्थित असलेले खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते यावेळी सभामंडपाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष नीलेश गाढवे, सचिव ॲड. सोमनाथ घोटेकर, पालखीप्रमुख नारायण महाराज मुठाळ, प्रसिद्धिप्रमुख अमर ठोंबरे, कांचन जगताप, माधव महाराज राठी, जयंत महाराज गोसावी, योगेश महाराज गोसावी, भानुदास महाराज गोसावी, श्रीपाद कुलकर्णी, नवनाथ महाराज गांगुर्डे, राहुल साळुंके यांसह विश्वस्त तसेच लहवीतकर महाराज, मुरलीधर पाटील, पुंडलिक थेटे आदी उपस्थित होते.

यावेळी मानकरी, विणेकरी यांसह मान्यवरांचा नारळ प्रसाद देऊन सन्मान करण्यात आला. दुपारी संत निवृत्तिनाथ मंदिरात आरती झाली. त्यानंतर चांदीच्या रथातून पालखी मार्गस्थ झाली. यावर्षी सुमारे पस्तीस हजार वारकरी वारीत सहभागी झाल्याचा अंदाज आहे. पालखी रथाची सजावट कैलास माळी यांनी स्वखर्चाने केली. शृंगारलेल्या रथात संत निवृत्तिनाथांच्या पादुका ठेवण्यात आल्या हाेत्या. मंगलमय वाद्य आणि हरिनामाच्या गजरात पालखी पुढे जात होती. रथाच्या पुढे भगूर येथील महिलांनी रांगोळ्या काढल्या. नंदकुमार मोरे यांचे मंगल वाद्य लक्ष वेधून घेत होते. रथाच्या अग्रभागी नगरा असलेली बैलगाडी सज्ज होती. पालखी प्रस्थानास माजी नगराध्यक्ष सुनील अडसरे, बाळासाहेब अडसरे, अजय अडसरे यांची बैलजोडी जोडण्यात आली आहे. पालखी सोहळा मार्गावर अडथळा निर्माण होऊ नये यासाठी पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

कुशावर्तावर पालखीची पूजा

तीर्थराज कुशावर्तावर नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्रीया देवचके व स्वप्नील देवचके यांनी पूजा केली. यावेळी माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, माजी उपनगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार-सोनवणे, अभियंता अभिजित इनामदार यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

गर्दीत चोरट्यांचा सुळसुळाट

पालखी प्रस्थानाच्या वेळी झालेल्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांची चांगलाच हात मारला. मंदिर परिसर, कुशावर्त चौक, त्र्यंबकेश्वर मंदिर चौक यासह गर्दीत महिलांचे मंगळसूत्र, सोन्याची साखळी आणि रोकड लंपास झाली. यामध्ये स्थानिक मुलींच्या गळ्यातील साखळ्या चोरीस गेल्या. संत निवृत्तिनाथ मंदिर ट्रस्ट विश्वस्तांनादेखील याचा फटका बसला. विश्वस्ताचेच पाकीट मारल्याने चोरी झालेल्यांनी पोलिस ठाण्यात गर्दी केली होती.

माजी नगरध्यक्षांची पंधरावी वारी

माजी नगराध्यक्षा पुष्पा झोले यांची ही सलग 15 वी वारी आहे. त्या १७ वर्षांपासून पायी पंढरपूरला जातात. मात्र, कोरोना कालावधीत दोन वर्षे दिंडी बंद राहिली. दरम्यान, पाऊस झाल्यावर दिवसभर चालत असलेले वारकरी एखाद्या घराच्या ओट्यावर किंवा अन्य ठिकाणी बसून राहतात. रात्र जागवावी लागते आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी वाटचाल सुरू होते, असा अनुभव त्यांनी कथन केला.

हेही वाचा :

The post Nashik : संत निवृत्तिनाथ पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान appeared first on पुढारी.

Exit mobile version