Site icon

Nashik : सप्तश्रृंगी गड विकासासाठी २५ वर्षाचे व्हिजन ठेवावे : पालकमंत्री दादा भुसे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि शक्तीपीठ म्हणून जनमानसात श्रद्धेचे प्रमुख स्थान असलेल्या सप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी लाखो भाविक दरवर्षी गडावर येतात. त्यामुळे येणाऱ्या २५ वर्षांचे व्हिजन समोर ठेवून विकास आराखडा तयार करावा, अशा सूचना पालकमंत्री दादा भुसे यांनी दिल्या आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी (दि. ७) आयोजित सप्तश्रृंगी गडाच्या विकास आराखड्यासंदर्भातील बैठकीप्रसंगी ना. भुसे बोलत होते. यावेळी आमदार नितीन पवार, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी यांच्यासह अन्य विभागांचे अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

पालकमंत्री भुसे म्हणाले, गडावरील पाणीपुरवठा योजनेसाठी ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत स्वतंत्र प्रस्ताव सादर करून निधी मागणी करावी. भाविकांच्या सोयीसाठी डोम उभारणे, शौचालय बांधणे, रस्त्यांची निर्मितीसह भवानी पाझर तलाव जलशुद्धीकरणाच्या पाईपलाईन दुरूस्ती, १०८ कुंडातील विविध कुंडांचे वनविभागाच्या समन्वयातून दुरूस्तीचे प्रस्ताव १५ दिवसात सादर करण्याचे, निर्देश भुसेंनी दिले.

गडावरील तसेच पादचारी मार्गावरील पथदिवे, प्रदक्षिणा मार्ग सुरू करणे, यात्रेच्या दिवसांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात दोन वाहनतळे निर्माण करणेसह गडावर स्वतंत्र पोलीस स्टेशनकरिता आणि वनविभागाच्या जागेवर ऊद्यान निर्मितीसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना भुसेंनी दिल्या. मंदिराच्या खालील भाग हा मातीचा असल्याने तेथे भूस्खलनातून दुर्घटना घडणार नाही यासाठीचे पूर्वनियोजन करावे. गडावर जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या गाड्या सुस्थितीत असल्याचीही खात्री करून घेण्यात यावी, असेही भुसे यांनी सांगितले.

नरेगाच्या 803 कामांचे उद्घाटन

बैठकीच्या प्रारंभी जिल्हा परिषदेमार्फत प्रत्येक तालुक्यात सुरू केलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या विशेष मोहिमेअंतर्गत 803 कामांचे ना. भुसे यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे उद‌्घाटन करण्यात आले. ही कामे दर्जेदारपणे पूर्ण करावीत. तसेच या कामांच्या माध्यमातून साधारण 3 लाख 16 हजार मनुष्य दिन निर्मिती होणार असल्याचेही भुसे यांनी सांगितले.

हेही वाचा :

The post Nashik : सप्तश्रृंगी गड विकासासाठी २५ वर्षाचे व्हिजन ठेवावे : पालकमंत्री दादा भुसे appeared first on पुढारी.

Exit mobile version