Nashik : सिन्नरच्या 17 गावांत उभारणार सौरऊर्जा प्रकल्प

सौरउर्जा प्रकल्प

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यात सौरऊर्जा प्रकल्प निर्माण करण्यासाठी महावितरण कंपनीच्या वतीने 128 गावांतील शासकीय जमिनीची पाहणी नुकतीच करण्यात आली. त्यात 17 गावांत सौरऊर्जा प्रकल्प निर्माण होऊ शकतो, असा निष्कर्ष निघाला आहे. या गावातील ग्रामपंचायतीकडून आवश्यक कागदपत्रे मागवून प्रस्ताव महावितरणच्या जिल्हा कार्यालयाला सादर करण्यात येत आहे. सतरापैकी पाच गावांनी प्रस्ताव सादर केले आहेत.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील 30 टक्के कृषी वाहिन्या सौरऊर्जेवर आणण्याबाबतचे धोरण सरकारने निश्चित केले आहे. या योजनेत शेतकऱ्यांना दिवसा आठ तास वीजपुरवठा करण्याचे धोरण आहे. ज्या गावात गावठाण व कृषी वीजवाहिन्यांचे विलगीकरण झाले आहे. अशा कृषी वीजवाहिन्यांचे सौरऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यादृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महावितरणला सरकारी जमिनीची पाहणी करण्याचे आदेश देण्यात आलेले होते.

दरम्यान जमीन खाचखळग्यांची, ओबडधोबड नसावी, 33/11 केव्हीए उपकेंद्रापासून 5 किमीपेक्षा कमी अंतर असावे, 2 ते 10 मेगावॉट निर्मिती एवढी क्षमता, पूर्णवेळ सूर्यप्रकाश मिळू शकेल, असे ठिकाण या निकषांवर सौरऊर्जा निर्मितीसाठी जागेची निवड करण्यात येत आहे.

मनेगावसह 17 गावांत अनुकूलता

दोडी बुद्रुक, दापूर, नळवाडी, कासारवाडी, वारेगाव, कोळगावमाळ, सायाळे, मोहदरी, वडगाव-सिन्नर, निमगाव- गुळवंच, केपानगर, हिवरगाव, वडांगळी, कहांडळवाडी, मनेगाव, पाटोळे, पिंपळे या गावांतील सरकारी जमिनी सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प योग्य आढळल्या आहेत. त्यामुळे सदरच्या ग्रामपंचायतीकडून विविध कागदपत्रे मागवण्यात आली आहेत.

या ग्रामपंचायतींकडून प्रस्ताव सादर

ग्रामपंचायतींना जमिनी देण्याबाबतचा ठराव, ना हरकत दाखला महावितरणकडे सादर करण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. त्यात मनेगाव, निमगाव-गुळवंच, पाटोळे, वडगाव-सिन्नर, पिंपळे आदी गावांनी आवश्यक ती कागदपत्रे महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली. ती जिल्हास्तरावर पाठवण्यात आली आहेत. उर्वरित ग्रामपंचायतींना आठ दिवसांत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा :

The post Nashik : सिन्नरच्या 17 गावांत उभारणार सौरऊर्जा प्रकल्प appeared first on पुढारी.