Nashik : सुरगाण्यातील गावांना 15 दिवसांत सुविधा द्या – जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

गंगाथरन डी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्यात कर्नाटक सीमाप्रश्नावरून वाद पेटला असतानाच सुरगाणा तालुक्यातील गुजरात सीमेलगतच्या १३ गावांनी पुरेशा सोयी सुविधांअभावी गुजरातमध्ये समावेश होण्याची मागणी केल्यानंतर जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी सुरगाणा तहसील कार्यालयात सोमवारी (दि.५) तातडीने प्रशासकीय बैठक घेतली. संबंधित गावांमध्ये १५ दिवसांत सुविधा पुरवण्याचे आदेश तालुका प्रशासनासह संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी बोलाविलेल्या आढावा बैठकीला प्रांताधिकारी विशाल नरवडे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, तहसीलदार सचिन मुळीक, गटविकास अधिकारी दीपक पाटील तसेच तालुकास्तरीय सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. बैठकीत या गावांच्या समस्या जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या. जिल्हा परिषद, वीज वितरण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या माध्यमातून विकासकामे प्राधान्याने करण्यात यावीत. निधीसंदर्भात नरेगा, जिल्हा नियोजन तसेच १५ व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव पाठवून त्वरित प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करावे, डॉक्टरांची कमतरता असल्यास जिल्हा शल्यचिकित्सक यांनी तातडीने त्या ठिकाणी डॉक्टरांची नियुक्ती करावी, शाळांमध्ये शिक्षकांची संख्या कमी असल्यास त्वरेने तिथे बदली शिक्षक द्यावा, गावांच्या जवळपास विजेचे उपकेंद्र नसल्यास गटविकास अधिकारी आणि उपअभियंता यांनी प्राधान्याने तेथे जागा मंजूर करून घ्यावी आणि लवकरात लवकर वीज सुरू करून द्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

दरम्यान,पालकमंत्री मंगळवारी (दि.६) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. पायाभूत सुविधा मिळत नसल्याने आता ही गावे दुसऱ्या राज्यात जाण्याचे निवेदन देत आहेत. याबाबतीत पालकमंत्री दादा भुसे काय भूमिका घेतात ते बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मित्तल यांचा दौरा

गटविकास अधिकाऱ्यांना दोन दिवसांत याबाबतचा अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिल्या असून, बुधवारी त्या संबंधित गावांचा पाहणी दौरा करणार आहेत. नरेगा आणि १५ व्या वित्त आयोगातून खर्च करून त्या गावांना सर्व सुविधा देण्यात येणार आहेत, असे मित्तल यांनी सांगितले.

गुजरातमध्ये जाऊन निवेदन

जिल्हाधिकारी समस्याग्रस्त गावांना भेट देऊन संबंधित गावकऱ्यांचे प्रश्न ऐकून घेतील, असे ग्रामस्थांना अपेक्षित होते. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी तालुक्याच्या मुख्यालयीच बैठक घेतल्याने गावकऱ्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे त्यांनी सीमेलगत असलेल्या गुजरातमधील डांग जिल्ह्यातील वाजदा तालुक्यातील रहिवासांनी तहसीलदारांना निवेदन दिले.

हेही वाचा :

The post Nashik : सुरगाण्यातील गावांना 15 दिवसांत सुविधा द्या - जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश appeared first on पुढारी.