Nashik : ‘हा’ तालुका वगळता नाशिक जिल्ह्यात थंडी गायब

तापमान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

निफाडमध्ये रविवारी (दि. ४) सलग तिसऱ्या दिवशी पारा ९.६ अंशांवर स्थिरावल्याने तालुक्यात थंडीचा कडाका जाणवत आहे. उर्वरित जिल्ह्यामधून थंडी गायब झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

बंगालच्या उपसागरातील कमी दाबामुळे वाऱ्यांचा वेग वाढला आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह अन्य राज्यांत ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच उत्तरेकडून येणाऱ्या पश्चिमी चक्रावाताचा परिणाम जाणवत असल्याने राज्यातील किमान तापमानात सरासरी २ ते ५ अंशांनी वाढ झाली आहे. मात्र, निफाडमध्ये सलग तीन दिवसांपासून पारा १० अंशांखाली असल्याने तालुक्यात गारठा जाणवत आहे. त्यामुळे ठिकठिकाणी शेेकोट्या पेटविल्या जात असून, पहाटेच्या वेळी द्राक्षबागांमध्ये धूरफवारणी केली जात आहे. त्याच वेळी नाशिक शहरात किमान तापमान १५.४ अंशांवर पोहोचल्याने नाशिककरांची थंडीपासून सुटका झाली आहे. तसेच उर्वरित जिल्ह्यातही किमान तापमानाच्या पाऱ्यात वाढ झाल्याने ऐन थंडीत उकाडा जाणवत आहे.

पण, वातावरणातील हा बदल गहू, हरभऱ्यासह अन्य रब्बी पिकांसाठी काहीसा नुकसानकारक असल्याने बळीराजाच्या चिंतेत भर पडली आहे. दरम्यान, चालू महिन्याच्या मध्यात पुन्हा एकदा थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हेही वाचा :

The post Nashik : 'हा' तालुका वगळता नाशिक जिल्ह्यात थंडी गायब appeared first on पुढारी.