Nashik Accident : बस अपघातातील 12 पैकी ‘इतक्या’ मृतांची ओळख पटली

nashik bus acci.

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
येथील मिरची चौकात शनिवारी (दि. 8) पहाटे लक्झरी बस आणि ट्रक अपघातात होरपळून मृत्यू झालेल्या बसमधील 12 पैकी 11 प्रवाशांच्या मृतदेहांची ओळख पटविण्यात पोलिस आणि रुग्णालय प्रशासनाला यश आले. उर्वरित मृतदेहाची ओळख पटविण्याचेही प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने सांगितले.

जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या शवविच्छेदन कक्षाबाहेर शनिवारी (दि. 8) दुपारपासूनच नातलगांची गर्दी झाली होती. मध्यरात्रीपर्यंत नातलग येतच होते. आप्तस्वकीयांचे मृतदेह बघितल्यावर नातेवाइकांच्या अश्रूंचा बांध फुटला आणि पुन्हा रुग्णालयात आक्रोश  12 पैकी 11 मृतांची ओळख पटली पसरला होता. रविवारी (दि. 9) देखील नातलगांची वर्दळ पाहावयास मिळाली. दिवसभर शवागृहाबाहेर नातेवाईक हुंदके देत एकमेकांना आधार देत होते. अनेकांचे कोणीच नातलग नाशिकला नसल्याने त्यांच्या ओळखीचे नागरिक जिल्हा रुग्णालयात येऊन त्यांना धीर देताना दिसून आले.

नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर झालेल्या ट्रक – खासगी बसच्या भीषण अपघातात 43 प्रवासी जखमी, तर 12 जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये 10 पुरुष, एक महिला आणि चिमुकलीचा समावेश आहे. मृतांमध्ये तिघांचे चेहरे शाबूत असल्याने त्यांची ओळख लगेचच पटली, तर दोघांच्या खिशात तिकीट सापडल्याने त्यावरून त्यांची ओळख पटविण्यात आली. इतर सहा जणांच्या अंगावरील खुणा, मृतदेहाजवळ सापडलेले साहित्या यांवरून ओळख पटविण्यात आली. एका मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम रविवारी सायंकाळपर्यंत सुरू होते. प्रशासनाने नऊ जणांचा मृतदेह नातलगांच्या ताब्यात दिला आहे, तर दोघांचे मृतदेह ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू होती. एकाच्या नातलगांच्या डीएनए चाचणीनंतर ओळख पटवून मृतदेह ताब्यात देण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.

मृतांची नावे :
अजय उर्फ शंकर मोहन कुचनकार (18, रा. मारेगावरोड, जि. यवतमाळ)
जितेंद्र रामपाल चंद्रशंकर (40, रा. राजाकिनी, जि. वाशीम)
कल्याणी आकाश मुंढोळकर (3, रा. बीबी, लोणार, जि. बुलडाणा)
पार्वतीबाई नागोराव मुंढोळकर (55, रा. बीबी, लोणार, जि. बुलडाणा)
उद्धव पंढरी भिलंग (55, रा. तरोडी, जि. वाशीम)
सुरेश लक्ष्मण मुळे (50, रा. बोरखडी, पुसद, जि. यवतमाळ)
ब—ह्मदत्ता सोगाजी मनवर (बसचालक) (45, रा. पोहरादेवी, जि. वाशीम)
वैभव वामन भिलंग (35, रा. तरोळी, जि. वाशीम)
अशोक सोपान बनसोड (58, रा. बेलखोडा, जि. वाशीम)
गजानन शालीकराम लोणकर (23, रा. आसेगाव, ता. रिसोड, जि. वाशिम)
हरिभाऊ तुकाराम भिसनकर (28, रा. वाटखेड, जि. यवतमाळ)

फरार डंपरचालकाला अटक
पंचवटी : औरंगाबाद रोडवरील कैलासनगर चौफुली येथे शनिवारी (दि. 8) पहाटे झालेल्या लक्झरी बस व मालवाहू ट्रक यांच्यात भीषण अपघात होऊन, लक्झरी बसने पेट घेतल्याने बसचालकासह 12 जणांचा होरपळून मृत्यू झाला. त्यानंतर संशयित ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला होता. आडगाव पोलिसांनी त्याच्या शोधार्थ पथक रवाना केले होते. शनिवारी रात्री उशिरा त्याला ताब्यात घेण्यात आले होते. त्याला न्यायालयात हजर केले असता, त्याचा जामीन मंजूर करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामजी लवकुश यादव (27, रा. उत्तर प्रदेश) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

अपघाताची घटना घडल्यानंतर संशयित ट्रकचालकाने घटनास्थळावरून पलायन केले. त्याच्या शोधार्थ आडगाव पोलिसांनी पथक रवाना केले होते. शोध सुरू असताना शनिवारी (दि. 8) रात्री उशिरा आडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतून संशयित ट्रकचालक रामजी यादवला ताब्यात घेतले असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक इरफान शेख यांनी दिली. आडगाव पोलिस ठाण्यात या चालकाविरुद्ध अपघाताचा व सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

The post Nashik Accident : बस अपघातातील 12 पैकी 'इतक्या' मृतांची ओळख पटली appeared first on पुढारी.