Nashik Accident : मुख्यमंत्री नाशिककडे रवाना, अपघातस्थळी व सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भेट देणार

नाशिक :

नाशिकमध्ये नांदूर नाक्‍याजवळ आज पहाटे खासगी बस आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला असून या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 29 प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विमानाने तातडीने नाशिकला निघाले आहेत.

मुख्यमंत्री 11.30 ला घटनास्थळी तर 12 वाजता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भेट देणार आहेत. अपघातातील जखमी रुग्णांची ते पाहणी करतील.

पहाटेच्या सुमारास हॉटेल मिर्ची येथील सिग्नलवर हा अपघात झाला. ट्रक (क्र. gj 05 bx 0226 ) धुळे हुन औरंगाबादच्या दिशेने जात होती तर बस (क्र. Mh29 aw 3100)  मुंबईच्या दिशेने जात होती. दोन्ही वाहने सिग्नल ओलांडत असताना ट्रकच्या इंधन टाकीजवळ बसची धडक बसली. त्यानंतर दोन्ही वाहने काही अंतर फरफटत गेली व छोटा हत्ती या वाहनावर धडकले. अपघातानंतर इंधनाचा भडका उडून बस पेटली. यात बस चालकासह एकूण दहा जण होरपळले. तर दोन लहान मुलासह एकूण 27 प्रवासी जखमी झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. जखमींचा खर्चही शासन करणार आहे.

मुख्यमंत्री जिल्हा रुग्णालयात अपघाती रुग्णांची पाहणी करण्यासाठी येणार आहे. त्यासाठी प्रशासनाने रुग्णालयाच्या आवारातील खड्डे तात्काळ बुजवायला सुरुवात केली आहे. (छाया: हेमंत घोरपडे)

हेही वाचा :

The post Nashik Accident : मुख्यमंत्री नाशिककडे रवाना, अपघातस्थळी व सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भेट देणार appeared first on पुढारी.