Nashik Accident : वाहतूक मंत्रालय समितीच्या पाहणीत अनेक धक्कादायक बाबी समोर

नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा
औरंगाबाद रोडवरील मिरची सिग्नलवर शनिवारी (दि. 8) पहाटे झालेला भीषण अपघात नेमका कशामुळे घडला, याबाबत वरिष्ठ पातळीवर चौकशी सुरू झाली असून, त्याकरिता रस्ते वाहतूक मंत्रालय समितीने मंगळवारी (दि.11) अपघातस्थळाची पाहणी केली आहे.

अपघात कसा घडला, कोणत्या कारणांमुळे घडला, यामध्ये नेमकी चूक कोणाची होती, असे अपघात भविष्यात घडू नये, याकरिता कोणकोणत्या उपाययोजना करणे गरजेचे आहे, तेथील सद्यपरिस्थिती व पुढील सुधारणा यासाठी आवश्यक माहिती गोळा करून ती संकलित करण्यासाठी रस्ते व वाहतूक मंत्रालय समिती नाशिकमध्ये दाखल झाली होती. त्यानुसार या समितीने नाशिक शहर पोलिस विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग, मनपा यांचे संबंधित अधिकारी व आडगाव पोलिस ठाण्याचे अधिकारी यांच्यासहित संयुक्तिक पाहणी दौरा केला. यात समितीने घटनास्थळावर असलेल्या अपघातग्रस्त बसची बारकाईने पाहणी करून निरीक्षणे नोंदवून घेतली. तसेच, यात कुठली चूक राहिली, आता याचा शोध शास्त्रीयद़ृष्ट्या घेतला जात आहे. नेमके कोण व कोठे कसे चुकले, आपत्कालीन यंत्रणांची मदत कधी व कशी पोहोचली, अपघात नेमका कसा झाला, बसमध्ये नेमके किती प्रवासी होते, घटनेनंतर जखमींसाठी बचावकार्य कसे राबविले गेले, अपघातातील किती जखमी नागरिकांवर कुठे उपचार सुरू आहेत, तसेच मृतांपैकी किती प्रवाशांची ओळख पटली आदींबाबत तपशीलवार माहिती आडगाव पोलिसांकडून जाणून घेतली.

अनेक धक्कादायक बाबी समोर :

या पाहणी दौर्‍यात अनेक त्रुटी आढळून आल्या असून, अपघातग्रस्त बस कंपनी चिंतामणी ट्रॅव्हल्सकडूनही वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून व्यवसाय सुरू असल्याची धक्कादायक बाब यात पुढे आल्याचे समजते. त्याबरोबरच चौकातील अतिक्रमण, अरुंद रस्ता, टर्निंग पॉइंट, सिग्नल यंत्रणा, चौकातील रस्त्यांचे रुंदीकरण अशा अनेक बाबीदेखील आढळून आल्या आहेत.

हेही वाचा :

The post Nashik Accident : वाहतूक मंत्रालय समितीच्या पाहणीत अनेक धक्कादायक बाबी समोर appeared first on पुढारी.