Nashik Budget : करवाढीला ब्रेक, आयटी-लॉजिस्टीकचा ओझरता उल्लेख

नाशिक महापालिका अर्थसंकल्प,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

प्रस्तावित मालमत्ता तसेच पाणीपट्टी करवाढीला ब्रेक देणारा अर्थसंकल्प सादर करीत प्रशासक तथा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी नाशिककरांना मोठा दिलासा दिला. मात्र आयटी पार्क, लॉजिस्टीक पार्कचा ओझरता उल्लेख अंदाजपत्रकीय निवेदनात करतानाच प्रकल्पांच्या उभारणीची जबाबदारी शासनावरच टाकल्याने नाशिककरांसाठी हा अर्थसंकल्प ‘कही खुशी कही गम’ असा ठरला आहे.

महापालिकेच्या आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून माजी पदाधिकारी व नगरसेवकांनी सुचविलेल्या कामांच्या प्रस्तावांच्या आधारे नवीन विकासकामांसाठी तब्बल ४७० कोटींची घसघशीत तरतूद या अंदाजपत्रकात करण्यात आली. मोठ्या घोषणा टाळत आयुक्तांनी या अंदाजपत्रकाच्या माध्यमातून पायाभूत सुविधा निर्मितीवर भर दिला आहे. भाजपच्या गत सत्ताकाळातील महत्त्वाकांक्षी गोदावरीसह उपनद्यांच्या प्रदूषणमुक्तीच्या दृष्टीने नमामि गोदा प्रकल्पासाठी तसेच स्मार्ट स्कूलसाठी या अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर, आगामी निवडणुकांच्या माध्यमातून निवडून येणाऱ्या नगरसेवकांकरीता स्वेच्छा निधी व प्रभाग विकास निधीपोटी करण्यात आलेली ५२.९१ कोटींची तरतूद प्रशासकीय राजवटीतील या अंदाजपत्रकाचे वैशिष्ट्य आहे.

महापालिकेच्या स्थायी समितीच्या अंदाजपत्रकीय सभेत मुख्य लेखा व वित्त अधिकारी नरेंद्र महाजन यांनी २०२२-२३ या आर्थिक वर्षाचे २३७७ कोटींचे सुधारीत तर २०२३-२४ या आर्थिक वर्षाचे २४७७ कोटी रुपयांचे मूळ अंदाजपत्रक प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना सादर केले. २४७५ कोटी ८६ लाख रुपये खर्चाच्या या अंदाजपत्रकात अखेरची शिल्लक १.२१ कोटी रुपये दर्शविण्यात आली आहे. शासनाकडून महापालिकेला भरीव निधी मिळण्याची अपेक्षा व्यक्त करत शहरातील रस्ते, पदपथ, उड्डाणपुल, जलवाहिन्या, मलवाहिका, परिवहन, विद्युतीकरण, उद्यान विकास, शिक्षण, वैद्यकीय सेवा, घनकचरा व्यवस्थापन आदी नागरी सुविधांच्या पूर्ततेसाठी तरतूद करताना शहराच्या समतोल विकासाचा प्रयत्न केला गेल्याचा दावा डॉ. पुलकुंडवार यांनी या अंदाजपत्रकाद्वारे केला आहे. ई-गव्हर्नन्सचा प्रभावी वापर करून सुलभ, पारदर्शक व गतिमान प्रशासकीय कामकाज करण्यावर भर देण्यात येत आहे. तसेच स्मार्ट स्कूल, पर्यावरण संवर्धन, नमामि गोदा, वैद्यकीय सेवा, आयटी पार्क विकसित करण्याच्या बाबींवर अंदाजपत्रकाच्या माध्यमातून भर देण्याचा प्रयत्न केल्याचे निवेदन पुलकुंडवार यांनी केले आहे.

दरम्यान, अंदाजपत्रकात येणाऱ्या आर्थिक वर्षात मालमत्ता किंवा पाणीपट्टी करात कोणतीही वाढ केली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. मात्र, यामुळे महापालिकेच्या तिजोरीवर बोजा पडण्याची शक्यता असल्याने, ज्या मालमत्तांवर कर अद्यापही आकारलेला नाही किंवा मालमत्तेचे कमी मूल्यांकन दाखविलेले आहे, शिवाय कर्मशिअल वापर असताना रहिवासी पाणी कनेक्शनचा वापर केला जात असेल अशा मालमत्ता शोधून त्यांच्याकडून मालमत्ता आणि पाणीपट्टी वसुली वाढविण्यावर महापालिकेचा भर असणार आहे. यातून २५ टक्क्यांपेक्षा अधिक मालमत्ता कर वसूल करण्याचे महापालिकेचे ध्येय असणार आहे.

यशवंत मंडईत पार्किंगची सुविधा

नाशिककरांसाठी महत्त्वाचा प्रकल्प असलेला व गेल्या काही वर्षांपासून प्रतिसाद न मिळाल्याने रखडलेला यशवंत मंडईतील पार्किंगचा प्रश्न पुढे घेऊन जाण्याचा निर्धार मनपा आयुक्तांनी व्यक्त केला. त्याचबरोबर शहरात ज्या-ज्या ठिकाणी महापालिकेच्या जागा आहेत, त्याठिकाणी मल्टीलेव्हल पार्किंग अंदाजपत्रकात प्रस्तावित करण्यात आली.

१०६ चार्जिंग स्टेशन

शहरातील प्रदूषण कमी व्हावे, तसेच नाशिकची पर्यावरणपूरक ही ओळख कायम राहावी याकरिता इलेक्ट्रिक व्हेईकलला चालना देण्यासाठी शहरात १०६ चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत. त्यातील २० स्टेशनबाबत तत्काळ निविदा प्रसिद्ध केली जाईल. तसेच केंद्र सरकारच्या एन कॅप या योजनेतून हे स्टेशन बांधण्यात येणार आहेत. खासदारांच्या प्रयत्नातून यूएनडीपीकडून २० ते २५ चार्जिंग स्टेशनसाठी पैसे मिळणार असल्याने त्याचीही लवकरच निविदा काढण्यात येईल.

सिंहस्थापूर्वी गोदावरी स्वच्छ

आगामी सिंहस्थापूर्वी गोदावरीतील प्रदूषण रोखणे तसेच गोदावरीचे पाणी कायम शुद्ध ठेवण्यासाठी नमामि गोदा प्रकल्प प्रभावीपणे राबविला जाणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत गोदावरी परिसरातील सौंदर्यीकरण, भाविकांसाठी सुविधा तसेच इतर पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी सविस्तर आराखडा तयार करण्याचे काम कन्स्लटन्टकडून सुरू असून, आराखडा तयार झाल्यानंतर तो केंद्र सरकारला सादर करून निधी मागविण्यात येणार आहे.

पथविक्रेत्यांना दुप्पट ते पाचपट कर्ज

केंद्राच्या प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेच्या अंमलबजावणीत नाशिक राज्यात प्रथम तर पथविक्रेत्यांना कर्जवाटपात दुसºया क्रमांकावर आहे. या योजनेअंतगत दहा हजार कर्जाचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना आता २० हजार व ५० हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच सदर लाभार्थ्यांना शासनाच्या इतर योजनांशी संलग्न करण्यात येणार आहे.

स्टेडियमसाठी तरतुद

महानगरपालिका क्षेत्रात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियमचे बांधकाम सुरू आहे. यापूर्वीच महासभा आणि स्थायी समितीने या स्टेडियमला मान्यता दिलेली आहे. त्याच्या पहिल्या टप्प्याचे काम यावर्षी झाले असून, दुसऱ्या टप्प्याचे काम चालू वर्षात हाती घेण्यात येणार आहे. त्याबाबतची तरतुद अंदाजपत्रकात करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांसाठी कॉमन फॅसिलिटी सेंटर

महापालिकेच्या माध्यमातून टिंकरिंग लॅबच्या माध्यमातून शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सायन्स सेंटर व कॉमन फॅसिलिटी सेंटरची उभारणी केली जात आहे. नवीन शैक्षणिक धोरणांनुसार संशोधनासाठी विद्यार्थ्यांना हे केंद्र उपयुक्त ठरणार आहे. सदर ठिकाणी वर्षभरात किमान १०० कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. टिंकरींग लॅबअंतर्गत मायक्रो कोर्सेस, विविध समुदायांसाठी नवीन प्रकल्प राबविण्याची योजना आहे.

टुरिझमसाठी फाळके स्मारक

फाळके स्मारकात टुरिझम विकसित करण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. याकरिता एमडी टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनला काही निधी उपलब्ध करून द्यावा याकरिता मनपाकडून पत्र लिहिण्यात आले आहे. तसेच ज्या ईवायला प्रतिसाद मिळाला नाही, तो पुन्हा प्रसिद्ध करण्याबाबतही महापालिका विचाराधीन आहे. त्याचबरोबर हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान विकसित करण्याचे काम सुरू असून, पहिला टप्पा मार्च अखेरपर्यंत विकसित करण्याचे प्रयत्न आहेत. दुसरा टप्पासाठी देखील तरतुद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

पेठरोडसाठी विशेष तरतूद

पेठरोडसाठी या अंदाजपत्रकात विशेष तरतूद करण्यात आली आहे. साधारणत: ३० मीटर रुंदीचा रस्ता विकसित करण्याचे प्रस्तावित आहे. आगामी सिंंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजन व आवश्यक कामांसाठी सविस्तर प्रस्ताव तयार केला जाणार आहे. बाह्यरिंगरोड, अंतर्गत रिंगरोड तसेच मिसिंग लिंक जोडण्यासाठी टीडीआर, एफएसआयच्या माध्यमातून भूसंपादन केले जाणार आहे.

पथविक्रेत्यांना दुप्पट ते पाचपट कर्ज

केंद्राच्या प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेच्या अंमलबजावणीत नाशिक राज्यात प्रथम तर पथविक्रेत्यांना कर्जवाटपात दुसऱ्या क्रमांकावर आहे. या योजनेअंतगत दहा हजार कर्जाचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना आता २० हजार व ५० हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच सदर लाभार्थ्यांना शासनाच्या इतर योजनांशी संलग्न करण्यात येणार आहे.

हेही वाचा :

The post Nashik Budget : करवाढीला ब्रेक, आयटी-लॉजिस्टीकचा ओझरता उल्लेख appeared first on पुढारी.