Site icon

Nashik Chandwad : वरदर्डी शनी महाराजांच्या चरणी हजारो भक्त लीन

नाशिक (चांदवड): पुढारी वृत्तसेवा 

‘ओम श्री शनेचराय नमः, शनी महाराज की जय’ चा नारा देत भाविक भक्तांनी शनिवार (दि. २१) रोजी असलेल्या शनी आमावस्येनिमित्त तालुक्यातील वरदर्डी येथील प्रसिद्ध पुरातन शनी महाराजांचे दर्शन घेतले. जिल्हाभरातील शनी भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याने दिवसभरात हजारो भाविकभक्त शनी चरणी लीन झाले.

शनिवारी आलेल्या आमावस्येनिमित्त वरदर्डी येथील शनीमंदिरात पहाटेच्या वेळी ‘शनी’ देवाला स्नान, पूजा, अभिषेक करण्यात येऊन काकड आरती करण्यात आली. त्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. शनी महाराजांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासून मोठी गर्दी केली होती. आमावस्येनिमित्त दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना सुलभ दर्शन घेता यावे यासाठी मंदिर ट्रस्टने चोख व्यवस्था केली होती. यामुळे भाविकांना दर्शन घेणे अत्यंत सोयीचे झाले होते. दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांनी शनी महाराजांच्या घोषणा दिल्याने संपूर्ण परिसर ‘शनिमय’ झाला होता.

दुपारी बारा वाजेनंतर ऊन वाढल्याने भाविकांची गर्दी काहीशी कमी झाली होती. दुपारी चार वाजेनंतर ऊन कमी झाल्यावर पुन्हा दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढली होती. यामुळे मंदिर परिसरात भाविकांच्या दर्शन रांगा लांबच लांब लागल्या होत्या. मंदिर परिसरात यावेळी विविध खेळण्याचे, पाळण्याचे, पेड्याचे दुकाने लावले होते. रात्री उशिरापर्यंत हजारो भक्तांनी शनी महाराजांचे दर्शन घेतले. त्याचप्रमाणे शहरातील पुरातन कार्तिकेश्वर शनी महाराज मंदिरात शनी आमावस्येनिमित्त भाविक भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

अशी आहे आख्यायिका …

वरदर्डी येथे विक्रमादित्य राजानेशनी महाराजांची तपश्चर्या केली होती. या तपश्चर्यामुळे शनी महाराजांनी प्रसन्न होत विक्रमादित्य राजाला दर्शन दिले होते. यामुळे विक्रमादित्य राजाने वरदर्डी येथील निसर्गरम्य वातावरणात शनी महाराजांचे भव्य असे मंदिर बांधले आहे. वरदर्डी येथील शनीमंदिरास पुरातन आख्यायिका असल्याने जिल्हा भरातून तसेच राज्यातून भाविक भक्त शनीमहाराजांचे दर्शन घेण्यासाठी येत असतात.

हेही वाचा : 

The post Nashik Chandwad : वरदर्डी शनी महाराजांच्या चरणी हजारो भक्त लीन appeared first on पुढारी.

Exit mobile version