Nashik Crime : आणखी दोघांच्या खुनाचा कट पोलिसांनी उधळला

nashik murder,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

छोटा टिप्पर गॅंगच्या ओम्या खटकी उर्फ ओम प्रकाश पवारसोबत का राहतो, अशी कुरापत काढून टोळक्याने २६ जूनला केटीएचएम महाविद्यालयाजवळ सागर सोनारला मारहाण केली होती. त्यामुळे मारहाण करणाऱ्या टोळीच्या म्होरक्यासह त्याच्या जोडीदाराचा खून करण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीतील तिघांना पंचवटी पोलिसांनी अटक केली. धक्कादायक बाब म्हणजे ओम्या खटकीने त्याला मारहाण करणाऱ्या संदीप आठवलेचा खून करीत बदला घेतल्याची भावना व्यक्त केली होती, त्याच प्रकारे वचपा काढण्यासाठी सोनार व इतर संशयितांनी दोघांच्या खुनाचा कट रचल्याचे उघडकीस आले आहे.

सागर हेमंत सोनार (१९, रा. चुंचाळे शिवार), तुषार बाळू खैरनार (२३, रा. आनंदनगर, पाथर्डी फाटा) व आविष्कार रमेश घोरपडे (१९, रा. जि. जळगाव) अशी पकडलेल्या संशयितांची नावे आहेत. इतर दोन संशयित अंधाराचा फायदा घेत फरार झाले आहेत. पंचवटीचे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक अनिल शिंदे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. संशयित हे शनिवारी (दि. २६) रात्री कुमावतनगर येथील पाटाच्या परिसरात गोळा होऊन हृषिकेश गणेश परशे उर्फ ऋषीबाबा (रा. कुमावतनगर) याच्यासह त्याच्या जोडीदाराचा खून करणार असल्याची माहिती मिळाल्याने पंचवटी पोलिसांनी सापळा रचून तिघांना पकडले. पाेलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, हृषिकेश परशे याने इतर १५ ते २० जणांसह मिळून २६ जूनला टिप्पर गॅंगच्या ओम्या खटकीसोबत राहात असल्याची कुरापत काढून सागर सोनारला बेदम मारहाण केली होती. त्यानंतरही चार दिवसांनी हृषिकेशने फोनवरून सागरला शिवीगाळ, दमदाटी केली होती. दरम्यान, ज्याप्रमाणे ओम्या खटकीने त्याला मारहाण करणाऱ्या संदीप आठवलेचा खून करून बदला घेतल्याची भावना व्यक्त केली, त्याचप्रमाणे आपल्याला मारहाण करणाऱ्या हृषिकेश व त्याच्या साथीदाराचा खून करून बदला घ्यायचा असे सागर सोनारने ठरवले होते. त्यानुसार सागरसह पाच जणांच्या टोळीने पंचवटीत गोळा होऊन खुनाचा कट रचला होता. मात्र त्याआधीच पंचवटी पोलिसांनी त्यांना पकडत त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. या प्रकरणी संशयितांविराेधात दरोड्याची पूर्वतयारी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मिथुन परदेशी, दिनेश खैरनार, उपनिरीक्षक योगेश माळी, सहायक उपनिरीक्षक अशोक काकड, माळोदे आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.

दोघांचा खून करण्याच्या उद्देशाने संशयित पंचवटीत आले होते. मात्र सापळा रचून संशयितांना पकडण्यात आले. पोलिसांना पाहताच संशयित फरार झाले. मात्र पोलिसांनी सुमारे दीड किलोमीटर पाठलाग करून तिघांना पकडले. इतर दोघांची नावे निष्पन्न झाली असून, त्यांनाही लवकरच पकडू. तिघांकडून कोयता, लोखंडी रॉड, दोरी, मिरची पूड जप्त केली आहे.

– अनिल शिंदे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पंचवटी.

हेही वाचा :

The post Nashik Crime : आणखी दोघांच्या खुनाचा कट पोलिसांनी उधळला appeared first on पुढारी.