Nashik Crime : चोरट्यांकडून ४५ तोळे सोन्यासह 28 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

45 तोळे सोने हस्तगत,www.pudhari.news

 नाशिक सिडको : पुढारी वृत्तसेवा

अंबड पोलिसांनी घरफोडी व फसवणुकीच्या दोन गुन्ह्यातून चार संशयितांना अटक करून त्यांच्याकडून ४५ तोळे सोने व रोख रक्कम असा २८ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केल्याची माहिती पोलिस उपायुक्त विजय खरात यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. (Nashik Crime)

यावेळी सहाय्यक पोलिस आयुक्त सोहेल शेख, अंबड पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख उपस्थित होते. यावेळी उपायुक्त विजय खरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक चिमाजी ठाकरे (४२, महालक्ष्मी नगर, अंबड नाशिक) यांच्या मुलीचा अज्ञान पणाचा गैरफायदा घेत संशयित आकाश संजय शिलावट (नाशिकरोड) याने तिच्याकडून तब्बल साडेबारा तोळे सोन्याचे दागिने घेतले होते. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी संशयित शिलावट यास सापळा रचून अटक करत त्याच्याकडून संपूर्ण साडेबारा तोळे सोने हस्तगत केले. तसेच दुसऱ्या एका घटनेत आनंद गोविंद रायककलाल (६२,रा. तिडके कॉलनी अंबड नाशिक) यांच्या घरात अज्ञात चोरट्याने (१६ ऑगस्ट) रात्रीच्या दरम्यान दरवाजाचे कुलुप उघडून त्यांच्या घरातील ३२ तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाचा पोलीस तपास करत असताना पोलीस नाईक उमाकांत टिळेकर,पोलीस शिपाई योगेश शिरसाठ यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख, पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक गणेश शिंदे, सहायक पोलिस निरीक्षक वसंत खतेले, पोलिस  उपनिरीक्षक संदीप पवार, अंमलदार मुकेश गांगुर्डे, संदीप भुरे, प्रवीण राठोड, तुळशीराम जाधव, किरण सोनवणे, किरण गायकवाड, हेमंत आहेर, राकेश राऊत, मच्छिंद्र वाघचौरे, जनार्दन ढाकणे, प्रशांत नागरे, मोतीराम वाघ यांच्या पथकाने सापळा रचून संशयित अक्षय उत्तम जाधव (२६ रा. दत्तनगर, अंबड, नाशिक, संदीप सुधाकर अल्हाट (२४,रा. कांबळे वाडी, भिम नगर, सातपुर), बाबासाहेब गौतम पाईकराव (२८, रा. कांबळेवाडी सातपुर, नाशिक), विकास प्रकाश कंकाळ (२१,रा. कांबळेवाडी, सातपूर, नाशिक) यांना अटक करून त्यांच्याकडून ३२ तोळे सोने व सोने विक्री करून त्या मोबदल्यात मिळालेले ६ लाख ५० हजार रुपये रोख रक्कम असा ऐवज जप्त करण्यात आला. याप्रकरणी पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख, पोलीस निरीक्षक नंदन बगाडे, पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक वसंत खतेले, पोलिस उपनिरीक्षक संदीप पवार, पोलीस शिपाई दिनेश नेहे व अनिल ढेरंगे करीत आहेत.

हेही वाचा :

The post Nashik Crime : चोरट्यांकडून ४५ तोळे सोन्यासह 28 लाखांचा मुद्देमाल हस्तगत appeared first on पुढारी.