Nashik Crime : तरुणाला गुंगीचे औषध देत धमकावून उकळले पैसे

अश्लिल ,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जुनी कार दाखविण्याच्या बहाण्याने टोळक्याने तरुणाला कारमध्ये बसवून त्याला गुंगीचे औषध पाजून बेशुद्ध केले. त्यानंतर त्याचे अर्धनग्न फोटो व व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत सहा जणांनी त्याच्याकडून ९५ हजार रुपये घेतल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी तरुणाने इंदिरानगर पोलिस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे.

वडाळा शिवारातील न्यू गरीब नवाज कॉलनीत राहणाऱ्या ३३ वर्षीय तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित इम्रान इनामदार (रा. साईनाथनगर, वडाळारोड) याच्यासह इतर दोन पुरुष व तीन महिलांनी हा गंडा घातला आहे. संशयितांनी या तरुणाला १४ सप्टेंबरला जुनी कार दाखविण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसवून त्र्यंबकेश्वरच्या दिशेने नेले होते. तेथे गुंगीचे औषध टाकलेले पाणी त्याला पाजले. त्यामुळे तरुणाला गुंगी आली. संशयितांनी त्याला अर्धनग्न करीत मुलीसोबत त्याचे फोटो व व्हिडिओ काढले होते. हे फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत संशयितांनी त्याच्याकडून रोख, ऑनलाइन पद्धतीने ९५ हजार रुपये काढून घेतले. वारंवार पैशांची मागणी होत असल्याने तरुणाने इंदिरानगर पोलिस ठाणे गाठून संशयितांविरोधात फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे.

हेही वाचा :

The post Nashik Crime : तरुणाला गुंगीचे औषध देत धमकावून उकळले पैसे appeared first on पुढारी.