
नाशिक : पुढारी वृत्तसेवा : म्हसरूळ लिंक रोडवरील हॉटेल कॅटल हाउस येथे म्हसरूळ पोलिसांनी बुधवारी (दि. १८) मध्यरात्री कारवाई करीत हुक्का पार्लर उद्ध्वस्त केले. या कारवाईत पोलिसांनी सात हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. विशेष म्हणजे म्हसरूळ पोलिसांनी जून महिन्यातही याच हॉटेलवर कारवाई केली होती. मात्र, कारवाई करूनही संशयितांनी पुन्हा हुक्का पार्लर सुरू केल्याने तो चर्चेचा विषय बनला आहे.
म्हसरूळ पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री कॅटल हाउस या हॉटेलवर छापा टाकला. तेथे हुक्का पार्लर सुरू असल्याची बाब पोलिसांच्या लक्षात आली. त्यामुळे पोलिसांनी हॉटेलचालक सौरभ संजय देशमुख (रा. म्हसरूळ-आडगाव लिंकरोड) व सुरेंदर प्रेमसिंग धामी (२९, रा. हॉटेल कॅटल हाउस) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पोलिसांनी तंबाखूचे पाकीट, फ्लेव्हर, फिल्टर, बिअरचे कॅन असा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान, म्हसरूळ पोलिसांनी जून महिन्यातही याच हॉटेलमधील हुक्का पार्लरवर कारवाई केली होती. तसेच सौरभ व सुरेंदरविरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र, कारवाई करूनही पुन्हा दुसऱ्यांदा गुन्हा दाखल झाला. जून व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या कारवाईत फिर्यादी व तपासी अंमलदारही एकच असल्याने तो चर्चेचा विषय बनला आहे. मात्र, हा योगायोग असल्याचे म्हसरूळ पोलिसांनी सांगितले. तसेच हॉटेल जागामालक, परवाना यांचा तपास केला जात असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजू पाचोरकर यांनी दिली.
वॉकीद्वारे संवाद
कॅटल हाउस हे हॉटेल रहिवासी वस्ती, मुख्य रस्त्यापासून लांब शेतात आहे. त्यामुळे हाॅटेलचालकाने एक व्यक्ती रहिवासी भागात नेमली होती. पोलिस येत असल्याचे समजताच संबंधित व्यक्ती हॉटेलमध्ये वॉकीटॉकीवरून पोलिस आल्याची माहिती देत होते. मात्र, पोलिसांनी छुप्या पद्धतीने कारवाई करीत दुसऱ्यांदा हुक्का पार्लरवर कारवाई केली.
हेही वाचा :
- Navratri 2023 Kalratri : दुर्गामातेचे आठवे रूप – महागौरी
- हर्निया कसा टाळाल? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
- Virat Kohli | विराट कोहलीने मोडला सचिनचा ‘हा’ विक्रम, २६ हजार धावा करणारा सर्वात वेगवान फलंदाज
The post Nashik Crime : त्याच हुक्का पार्लरवर दुसऱ्यांदा कारवाई appeared first on पुढारी.