
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरात दुचाकी चोरी करणाऱ्यास भद्रकाली पोलिसांनी व वाहनचाेरी विरोधी पथकाने सापळा रचून जेरबंद केले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीच्या २० दुचाकी हस्तगत केल्या आहेत. हबीब हनिफ शहा (२३, रा. भारतनगर) व हेमंत रमेश सोनवणे (३५, रा. सटाणा) अशी पकडलेल्या संशयितांची नावे आहेत.
शहरात वाहनचोरी होत असल्याने पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी चोरट्यांना पकडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ॲण्टीमोटार सायकल थेप्ट पथकाने सापळा रचला होता. पथकातील पोलिस अंमलदार इरफान शेख यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे सहायक पोलिस निरीक्षक अभिजित सोनवणे, अंमलदार प्रभाकर सोनवणे, संतोष पवार, संदीप रसाळ, शिवाजी मुंजाळ आदींच्या पथकाने एन. डी. पटेल राेड परिसरातून हबीब शहा यास पकडले. त्याच्याकडून चोरीच्या चार दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. या दुचाकी पंचवटी, भद्रकाली व सरकारवाडा पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून चोरल्याची कबुली हबीबने दिली आहे.
तर दुसऱ्या कारवाईत भद्रकालीचे पोलिस अंमलदार धनंजय हासे व सागर निकुंभ यांनी वेशांतर करून संशयित हेमंत सोनवणे यास पकडले. त्याच्याकडून पोलिसांनी आठ लाख पाच हजार रुपयांच्या १६ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. यापैकी भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतून सर्वाधिक दुचाकी चोरल्या आहेत. त्याने दुचाकी चोरल्याचे आठ गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले असून, पोलिस सखोल तपास करीत आहेत. पोलिस उपआयुक्त किरण चव्हाण, सहायक आयुक्त दीपाली खन्ना, पोलिस निरीक्षक दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
हेही वाचा :
- कोल्हापूर : बोलोली ग्रामपंचायतीवर स्थानिक आघाडीचा कब्जा
- विधानभवनातून : ठाकरेंची रणनीती अन् अजितदादा थंड
- नाशिकरांवर लादलेली अवाजवी करवाढ रद्द करा; शिंदे गटाचे आयुक्तांना साकडे
The post nashik crime : दुचाकी चोरट्यांकडून २० वाहने जप्त appeared first on पुढारी.