Nashik Crime : पोलिसांकडे तक्रार केल्याचा राग आल्याने दुचाकी जाळली

दुचाकी जाळली,www.pudhari.news

नाशिक : पोलिसांकडे तक्रार केल्याचा राग आल्याने एकाने दुचाकीची जाळपोळ केल्याची घटना शरणपूर रोडवरील मिशन मळा परिसरात घडली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात संशयित नीलेश खंडीजोड याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंजली गुळवे यांच्या फिर्यादीनुसार, बुधवारी (दि. ३) पहाटेच्या सुमारास संशयित नीलेश याने कुरापत काढून दुचाकीची जाळपोळ केली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस तपास करीत आहेत.

अपघाती मृत्यू प्रकरणी टेम्पोचालकाविरोधात गुन्हा

नाशिक : विरुद्ध दिशेने टेम्पो चालवून रिक्षास धडक दिल्याने एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात टेम्पोचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी (दि. ३) सकाळी झालेल्या अपघातात लक्ष्मण ज्ञानेश्वर पाचाराणे (४७, रा. वडनेर रोड) यांचा मृत्यू झाला. संशयित किरण शांताराम सोळुंके (२८, रा. संगमनेर, जि. अहमदनगर) याने भरधाव टेम्पो विरुद्ध दिशेने चालवून एमएच १५ एके ५२१२ क्रमांकाच्या रिक्षास समोरून धडक दिली. त्यात लक्ष्मण यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात टेम्पोचालक सोळुंकेविरोधात गुन्हा दाखल आहे.

रिक्षाचालकाकडून बसचे नुकसान

नाशिक : रिक्षाचालकाने महामंडळाच्या बसची काच फोडून नुकसान केल्याचा प्रकार मंगळवारी (दि. २) सायंकाळी आठच्या सुमारास बोधलेनगर परिसरात घडला. या प्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात एमएच १५ एफयू ९०४० क्रमांकाच्या रिक्षाचालकाविरोधात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. सागर रुपनर (रा. जि. सांगली) यांच्या फिर्यादीनुसार, बस डाव्या बाजूस घेतल्याचा राग आल्याने रिक्षाचालकाने बसची तोडफोड केली. या प्रकरणी मुंबईनाका पोलिस तपास करीत आहेत.

गॅसच्या भडक्यात एक ठार

नाशिक : गॅसचा भडका उडून गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मुरलीधर सोमनाथ पवार (५०, रा. शिवाजीनगर, गंगापूर शिवार) असे या व्यक्तीचे नाव आहे. पवार हे २७ एप्रिलला सायंकाळी गॅसच्या भडक्यात गंभीररीत्या भाजले हाेते. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.

हेही वाचा : 

The post Nashik Crime : पोलिसांकडे तक्रार केल्याचा राग आल्याने दुचाकी जाळली appeared first on पुढारी.