Nashik Crime : फेसबुक पोस्टच्या वादातून सातपूरला युवकाची हत्या

सातपूरला युवकाची हत्या,www.pudhari.news

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा

फेसबुक पोस्टच्या वादातून युवकाच्या डोक्यात लोखंडी सळई मारुन हत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या सातपूर मध्ये घडली आहे. सातपुर गावातील गोरक्षनाथ रोड मळे परीसरातील काश्मिरे व सोनवणे यांच्या मळ्यातील चाळीत भाडेतत्त्वावर राहणाऱ्या परप्रांतीय तरुणांमध्ये (दि.17) रात्री साडेअकरा ते बाराच्या सुमारास वाद झाला, त्यातुन संतोष जयस्वाल या परप्रांतीय तरूणाचा खून करण्यात आला आहे.

याबाबत सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार,  सोनवणे चाळीतील मुन्ना निषाद व रामकिशन निषाद नावाच्या परप्रांतीय संशयित आरोपीने काश्मिरे चाळीतील संतोष जयस्वाल (वय 30, मुळगाव आझमगड) या युवकास लोखंडी राॅडने डोक्यात मारुन गंभीर मारहाण केली. जखमी संतोष जयस्वाल याला त्याच्या नातेवाईकांनी सातपुर येथील खासगी तसेच ईएसआय रुग्णालयात उपचारासाठी नेले असता, त्यांना जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले. जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय पथकाने जखमी संतोष जयस्वालची तपासणी केली असता त्याला मृत घोषीत केले.

या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली असता सहायक पोलिस आयुक्त सोहेल शेख, सातपूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण, पोलीस निरीक्षक सतीश घोटेकर, गुन्हा शोध पथकाचे मोहिते, डी. के.पवार, राजेंद्र भावसार यांच्यासह पोलिसांची पथके तत्काळ घटनास्थळी पोहचले. दरम्यान संतोष जयस्वाल मयत झाल्याचे समजताच मारहाण करणारा संशयित रामकिशन निषाद व त्याचे अन्य साथीदार फरार झाले होते. पोलिस प्रशासनाने फरार मुन्ना निषाद याला चौकशी साठी ताब्यात घेतले आहे. संतोष जयस्वाल हा गॅरेज मॅकेनिक चे काम करीत होतो. संतोष याने फेसबुकवर फोटो पोस्ट केल्यानंतर संशयित आरोपीने हसल्याची कमेंट टाकली होती, यावरून दोघांचे वाद असल्याचे समजते. पुढील तपास सातपूर पोलीस करीत आहेत.

हेही वाचा :

 

The post Nashik Crime : फेसबुक पोस्टच्या वादातून सातपूरला युवकाची हत्या appeared first on पुढारी.