Nashik Crime : बंदुकीचा धाक दाखवत डॉक्टरला लुटले

बंदुकीचा धाक दाखवून लुटले,www.pudhari.news

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा ; टाकळी विंचूर येथे वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉ. विनोद चंद्रभान ढोबळे यांना विंचूर एमआयडीसीजवळ तिघांनी पिस्तुलाचा धाक दाखवत सुमारे सव्वादोन लाख रुपयांना लुटले. दोघा लुटारूंनी त्यांच्या तसेच पत्नीच्या एटीएम कार्डमधून पैसे काढून घेतल्यानंतर हातपाय बांधत डॉक्टरांना झुडपात टाकून देत त्यांच्या कारमधून पलायन केले.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, १३ ऑक्टोबरला विंचूर एमआयडीसीजवळून डॉ. विनोद ढोबळे कारने रात्री नऊच्या सुमारास जात असताना अचानक दुचाकीस्वार कारसमोर येत त्यांची कार रोखली. दोघांनी खाली उतरत त्यातील एकाने डॉ. ढोबळे यांच्या डोक्याला पिस्तूल लावले आणि दुसऱ्याने जबरदस्तीने कारचा दरवाजा उघडला. आत शिरताच त्यांनी डॉ. ढोबळे यांना बाजूच्या सीटवर ढकलून दिले व दुसरा लुटारू कारमध्ये पाठीमागे बसला. त्याने डोक्याला पिस्तूल लावत पैशाची मागणी केली. विंचूर येथील वाइन पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यावर शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला. पिस्तुलाचा धाक दाखवून दोघा लुटारूंनी त्यांना कारसह थेट येवल्यातील एटीएम केंद्राकडे नेले. डॉक्टरांच्या खिशात असलेले त्यांचे तसेच पत्नीचे असे चार एटीएम कार्ड घेतले आणि पिन क्रमांक वापरून दोन लाख १९ हजार रुपये काढून घेतले आणि पांढऱ्या रंगाची अल्टो कार (एमएच १५ एफटी ३९६२) घेऊन फरार झाले. हे दोघे एकमेकांशी शाहरुख आणि गणेश असे नावाने बोलत होते. फरार होण्यापूर्वी त्यांनी अंदरसूल गावाजवळ डॉक्टरांना हातपाय बांधून झुडपात फेकून दिले होते. या प्रकरणी लासलगाव पोलिस कार्यालयात गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास पोलिस करत आहेत.

हातपाय बांधले, तोंडात कोंबला बोळा

डॉक्टरच्या खिशातील चार एटीएम कार्ड काढून घेऊन एटीएमचा पिन विचारला. त्यानंतर लुटारूंनी कार येवला शहरातील भांडगे पैठणीजवळ असलेल्या एटीएमसमोर कार उभी करून डॉक्टरांच्या खात्यातून पैसे काढून कार औरंगाबादच्या दिशेने नेली आणि मारहाण केली. अंदरसूलच्या पुढे काही अंतरावरावर निर्जन ठिकाणी गाडी थांबवून हातपाय बांधून तोंडात बनियन कोंबून झुडपांत टाकून पसार झाले.

हेही वाचा :

The post Nashik Crime : बंदुकीचा धाक दाखवत डॉक्टरला लुटले appeared first on पुढारी.